वाटेवरचा हिरवा किडा
अजूनही वळवळतो आहे
अंतरीच्या गूढ गर्भी
हिरवा चाफा शोधतो आहे
डोळ्यावरच्या तिरीपेसाठी
पिंपळ छाया शोधतो आहे
पौर्णिमेच्या चंदनरात्री
तिसरा डोळा शोधतो आहे
पानगळीच्या गालीच्यावर
हिरवे पान शोधतो आहे
भावनेच्या वातीसाठी
नास्तिक देव शोधतो आहे
वाटेवरचा हिरवा किडा
अजूनही वळवळतो आहे
पानगळीच्या गालीच्यावर
हिरवे पान शोधतो आहे
अंतरीच्या गूढ गर्भी
हिरवा चाफा शोधतो आहे.
(वाट- आयुष्य
किडा- आपण/ व्यक्ती
हिरवेपणा- जगण्याची इच्छा/ वृत्ती
हिरवा चाफा- जाणवणारे पण पटकन न सापडणारे/ न समजणारे असे काही( ज्ञान, तत्वज्ञान, धर्म, शास्त्र, कला,....)
डोळ्यावरची तिरिप- जशी त्रासदायक असते तसा जगतानाचा अनुभव
पिंपळ- फार काही सृजन नसणारा पण तरीही अस्तित्वाचे महत्व असणारा जीव म्हणजे आपण स्वत:
छाया- सुख
पौर्णीमेची चंदनरात्र- सुखाचा काळ
तिसरा डोळा- सगळं संपणारं आहे अन पुढे नवीन काही आहे प्रलय अन सृजन यांचं न संपणारं चक्र
पानगळीचा गालिचा- सृष्टीचे हे जीवनमरणाचे चक्र
हिरवे पान - पुन्हा जगण्याची इच्छा हाच संदर्भ
भावनेची वात- मानवी मनातील माणूसपणाची भावना
नास्तिक देव शोधतो- कोणी एक निर्माता नाही हे माहिती असूनही मानव्यपणात देव शोधणं)