Wednesday, March 16, 2016

कातळावरची राणी


प्रकाशचित्र:  सौजन्य :  चैतन्य खिरे 

चहूकडे पाणी आणि कातळावर राणी    
भरून आली मनामधे निळी निळी गाणी

काठावरले वृक्ष त्याची जळात साउली
हलती डुलती पाने, तिला त्याच्या चाहुली

रावा उडे इथे तिथे, करावया पाहणी
रंगुनिया प्रेमात ती, घरटे नाजुक विणी

पिल्ले दोन सानुली, जणु घरटे ओंजळी
लुकलुकु डोळे अन, मऊमऊ लव्हाळी

दिन सारा येर झारा, भूक पिलांची कोवळी
मायबाप देती घास, चोच जणु रोवळी

घंटा निनादे काठावरली,  उंच राउळी
येई हळु विसाव्यास, रात्र निळीकाळी







किनारा


निळ्याशार पाण्याला लगटून    
पहुडलेली गुलबट पांढरी रेती...
रेती, जितकी हातात घट्ट पकडावी
तितकी सरसर निसटून जाणारी
अन लाटा, जितक्या कवेत घ्यावात
तितक्या हुलकावणी देऊन परतणाऱ्या...

कळली, कळली म्हणे पर्यंत
राधे, धारे सारखी फक्त स्पर्शून जाते
अन तो कन्हैय्या तर, स्पर्शून जाताना
पायाखालचा आधारही निसटू निसटू करून जातो

राधा काय, कृष्ण काय
दोघांना सुटं सुटं सापडवणं
काही खरंं नाही, काही सोपं नाही.
पण ते दोघे जेव्हा मिळून जातात
एकमेकांत, होऊन जातात एकरुप,
मग सोपं होतं त्यांना समजणं,
ओली पुळण सहज बसते हातात
अन खाली साचलेलं पाणीही
सहज होतं ओंजळीत घेणं

किनाऱ्यावर पहुडलेले दोघे
गुलबट गोरी राधा,
अन तिला कवेत घेणारा
निळा कृष्ण

Thursday, January 28, 2016

भोज्या

खरच, तिथे काही नव्हतच...

घाबरण्यासारखं किंवा उदात्त वगैरे,
लखलखित प्रकाश किंवा
गुढगंभीर अंधार...
असं नव्हतंच काही ...

एक मंद, शांत, दिलासा देणारा
निळसर प्रकाश, एक अनामिक शांतता
आणि एक अनाकलनीय निर्विकारता...
आणि शांत मंद
दिलासादायक
निळा प्रकाश

एका क्षणी, खोल गाभाऱ्यातून उमटावेत
तसे डॉक्टरांचे शब्द
मनावर हलकेसे उमटत गेले...
श्वास घे, बेटा, श्वास घे...
मोठा श्वास घे बयो...
हळुहळू घंटेचे नाद उमटत रहावेत
तसे मनावर निनादत राहिले...

मी मजेत, निवांत
हळूच हसूऩ म्हटलं सुद्धा,
घेतेय की श्वास, नका काळजी करू...
अन मग डॉक्टरांचा
थोडे डळमळीत आत्मविश्वासातून
उमटलेले शब्द
मनावर आघात करत गेले...
मुली बोलू नकोस, श्वास घे
तुझ्या लेकासाठी तरी श्वास घे,
मोठा श्वास घे बयो...

अन मग मनातली ती
शांतता, तृप्तता हळुच हलली
लेकाचा चेहरा, त्या स्पंदनातून
सावकाश मनात उमटत गेला.
अन एक मोठा श्वास
जणू छाती भेदून शरीरात घुसला
अन त्या मंद प्रकाशातून
मी उलटी फिरले

आता डॉक्टरांचा आवाज समिप आला
गुड, मोठा श्वास घे
हळुहळू नेणिवेतली स्पंदनं
मनावर उमटू लागली
श्वास घेतला पाहिजे
ही जाणीवपूर्वकता आली
हळूहळू डोळ्यांच्या फटीतून
स्वच्छ पांढरा प्रकाश
जाणवू लागला

मनातल्या वलयांमधून
डॉक्टरांचा चेहरा
सांधला जाऊ लागला
आता तिथे एक आश्वासक हसू
माझी वाट पहात होते

मी पण हसले...
हसण्याच्या प्रयत्नात
एक मोठा ठसका बाहेर पडला
एक मोठा श्वास
भस्सकन शरीरभर
पसरत गेला...

अन तक्क्षणी लक्षात आलं,
अजून लेकाला,
त्याची आई
काही वर्ष तरी
नक्की मिळणार आहे!

पण खरच सांगते,
त्या तिथे भितीदायक
काहीही नव्हतं.
गुढगंभीर अंधार नव्हता
लखलखित साक्षात्कारी मूर्तीचा
कोणताही आकार नव्हता.

फक्त एक आश्वासक, आल्हाददायक,
असीम शांत असा
मंद निळा प्रकाश फक्त...
म्हटलं ना,
बाकी काही नव्हतं
तिथे...




नाळ

माझी सुपीक कुस उखडलीस तू...
सृजनाची लाल, ओली माती
कधीच झुगारून दिलीस
आत, आत खुरपत गेलास
अगदी  तुटली माझी
गाभ्यातली कणखरताही
एक एक ओलेपण
शोषून घेतलस
आणि टणकपणा
सगळा पोखरलास

अन उभी करत राहिलास
तुझी नवनिर्मिती ...
उंच उंच उभी करत गेलास
तुझ्या प्रगतीच्या
खाणाखुणा...
माझ्या पासून आपली नाळ
तोडत उठत राहिलास
उंच उंच अवकाशात
माझ्यापासून दूर दूर

पण माझ्यातले सृजन
शोषून घेण्यासाठी
पाय घट्ट रोवत राहिलास
माझ्याच कुशीत खोलवर
मातीतून उठशील वर वर
पण परतशील खोल खोल

Thursday, October 29, 2015

वाटचाल

अहंचे काटेरी झुडूप
केलं थोडे दूर
तर असतोच रस्ता
सोपा सहज अन आनंदाचा

स्वार्थाचे खडक फोडून
केले अंमळ दूर,
तर नितळ झरे
सोबतीने असतातच वहात

मानपानाचा काथ्याकूट
वेळोवेळी केला साफ
तर मैत्रीच्या सुंदर बागा
करतातच वाट, रंगीत अन सुगंधी

"मी" लाच केले जssरा दूर
बघितले जssरा "स्व"च्या पल्याड
तर असतोच की पायाखाली
मुक्तिचा मार्ग!
       

मागू तुज प्रित कशी


मागू तुज प्रित कशी ,
अचपळ मन माझे
हृद्यातील वीज वेडी ,
उत्सुक पडण्या परि

पाहू कसे रुप तुझे
दिपले नयन माझे
कोसळे वर्षा अवेळी
अवाक स्तब्ध त्यात मी

चंचल नजर तुझी
स्थिर राही क्षणभरी
नाहतो नखशिखांत
मंत्रमुग्ध भ्रांतचित्त

हासती गुलाब गाली
आवाहने देती किती
हलकेच जाता पुढति
जाग नयनात येई

पाहतो जागेपणी मी
स्वप्ने तुझी भारलेली
प्रित वेडी हृद्यातली
परि येई ना ओठी





Tuesday, September 22, 2015

परवीन शकिर यांच्या खुशबु चा अनुवाद

तुझसे तो कोई गिला नहीं है
क़िस्मत में मेरी सिला नहीं है

बिछड़े तो न जाने हाल क्या हो
जो शख़्स अभी मिला नहीं है

जीने की तो आरज़ू ही कब थी
मरने का भी हौसला नहीं है

जो जीस्त को मोतबर बना दे
ऐसा कोई सिलसिला नहीं है

ख़ुशबू का हिसाब हो चुका है
और फूल अभी खिला नहीं है

सरशारी-ए-रहबर में देखा
पीछे मेरा क़ाफ़िला नहीं है

इक ठेस पे दिल का फूट बहना
छूने में तो आबला नहीं है !
                  - परवीन शकिर
........

नाही तक्रार तुझ्याबद्दल काही
नशिबात माझ्या नाही यश काही

दुरावण्याचे असेल दु:ख तरीही
भेटलाही न सखया अजून जरीही

जगण्याची कधीही इच्छाही नव्हती
अन मरणाचे तरीही धाडस नाही

जगणेच सारे कठिण झालेले
असे तर नाहीच काही घडलेले

सुवास तर केव्हाच येऊन पोहोचलेला
मागमूसही नाही पण उमलण्याचा

चालूच आहे मार्गक्रमण अजूनि
अन् सोबतीस नाही कोणीच कोणी

ठेच एक सारी वेदना पिळवटणारी
निरखून बघितले व्रण साधा एक नाही
                               - आरती

Thursday, September 17, 2015

शाम सखी



उभी कधीची यमुनातीरी
मध्यान सरली, उन्हे उतरली
शाम वेळ अन शाम न सोबती
धीर न उरला मनी जराही
हूरहूर, काहूर मनी दाटली
अंधारुनि आली सृष्टी सारी
शाम सखी मी, शाम सखी

दाट धुक्याने वाट अंधुकली
शीरशिरी उठली यमुने वरती
सोबत तिच्या मी आसुसलेली
पाठराखणीस कदंब सावली
पु-या मिसळलो आम्ही तिघी
एकच तू, नयनी - हृदयीही
शाम सखी मी, शाम सखी

अवनी सारी गंधीत झाली
त्यात मिसळली धुंद पावरी
घेऊन तुझिया चाहूल आली
अंतर्बाह्य पुलकित झाली
राहिले न मी, मी माझी
तूच तू, झाले मी सारी
शाममय मी, शाम सखी
          

Friday, September 4, 2015

का निजशी असा रे बाळा...

आज सकाळी पेपर बघितला. खूप खूप वाईट बातमी अन मन पोखरून टाकणारा फोटो... मन विषण्ण झालं. अन या ओळीतून त्याला जोजवत राहिले


का निजशी असा रे बाळा...

का पुरली नाही तुजला
तुला आईची मांडी
शोधलास किनारा
धगधगत्या वाळुचा
का निजशी असा रे बाळा...

तहान होती तुजला
गोड दूध पिण्याची
मग तोंड लावशी का
खाऱ्या पाण्याला
का निजशी असा रे बाळा...

दुडुदुडु धावताना
किती गोड तू दिसशी
मग आता असा का
गपगार झालास पालथा
का निजशी असा रे बाळा...

का देश सोडताना
नाहीच मिळाली कुशी
निर्वासित शिक्का राहिला
का तुझ्याही कपाळा
का निजशी असा रे बाळा...

ना कणव ना माया
निरागस तुझ्या मरणी
जगास दाखवी आरसा
भयाण हृदयशून्यतेचा
का निजशी असा रे बाळा...



Friday, August 14, 2015

राधे राधे, जपून ठेव ग

बाऊल लोकगीत गाणाऱ्या पार्वती बाऊल यांच्या एका बंगाली गीतावर आधारित माझी कविता

राधे राधे, जपून ठेव ग, मधुसुदनाची प्रेम कहाणी

पळ पळ राहु दे ऱ्हदयी, 
गाभाऱ्यात आरसपानी,
तसेच राहो शाम आस ही; 
अस्पर्श, अशब्द, अविनाशी
राधे राधे, जपून ठेव ग, मधुसुदनाची प्रेम कहाणी

गुपीत मनातच राहू देई, 
बोलू नको शब्द काही
न कोणा ओळखू येई, 
न कोणा समजेल काही
राधे राधे, जपून ठेव ग मधुसुदनाची प्रेम कहाणी

विरह शाम सख्याचा देईल, 
दु:ख  तुजला गे राणी
त्या त्या वेळी बघ आभाळी, 
गडदमेघ तू निरखत राही
राधे राधे, जपून ठेव ग, मधुसुदनाची प्रेम कहाणी

उकिडवे रांधता काही; 
डोळा येता खळ्ळकन पाणी
ढकल सखे ग ओले लाकूड; 
धूर तयाचा सारे लपवी
राधे राधे, जपून ठेव ग, मधुसुदनाची प्रेम कहाणी

शाम रंगी रंगून जाता, जपून ठेव तुझे ते वसन रेशमी
भवचक्राच्यातून फिरताफिरता; वसनाची का चिंता करिशी
राधे राधे, जपून ठेव ग, मधुसुदनाची प्रेम कहाणी