Wednesday, May 21, 2008

निसर्ग चक्र

छोटे छोटे
थेंब चिमुकले
नभांनाही
जड झाले

पावसानेही
टाकूनि दिले
पर्वतालाही
नाही पेलले
नद-नद्यांनी
वाहून दिले

अखेर त्यांना
रडूच फुटले
खारट आपले
अश्रू घेऊनी
समुद्राच्या
कुशीत शिरले


Saturday, March 8, 2008

सर

आज पडणारच थोडा पाऊस
होणारच हवा थोडी गार
होणारच गारांचा शिडकावा
अन थोडे कोवळे ऊनही

हवेत येणारच थोडे धुके
अन पानांवर ओथंबलेले दव
पाखरांना फ़ुटणारच कंठ
अन झाडांना फुलांचे धुमारे

होणारच सर्वांचे मुड जरा बरे
येणारच चेह-यावर हसू थोडे
होणार मने ताजी तवानी
येणार जुन्या जुन्या आठवणी

थोड्या पावसाच्या, गप्पांच्याही
पडणारच थोडावेळ तरी इंद्रधनुष्य
आज होणारच तुमचा अंमल
आज येणारच पाऊस - सर !

Tuesday, January 15, 2008

राग - लोभ

माझा राग, तुझा लोभ
माझी चिडचिड, तुझे हास्य

म्हटले तर आग, नाही तर जल
आपलेच दात, अन आपलेच ओठ

माझं मानलं तर, मनाला झोंबलं
आपलं मानल तर, पोटात घातलं

Saturday, May 21, 2005

चाळीशी



तशी मनाने मी कणखरच .
लहानपणी मी रडल्याचे
नाही आठवत कुणालाच.

लहानपणी रडण्यापेक्षा
भांडून गोष्टी मिळवण्यावरच
होता माझा कल !

अन तरूणपणी
रडण्यापेक्षा, हक्क मिळवण्यासाठी
झगडण्यावरच होता माझा भर !

सासरी देखील
मुळुमुळु रडण्यापेक्षा
प्रसंगी वाईटपणा घेऊन
केली कर्तव्ये पार !

बाळाच्या आजारपणात,
त्याच्या ट्रीपल-पोलियोच्या वेळेस,
त्याला शाळेत सोडताना
तसे नाहीच वाहिले
डोळे फार !

अन
आता पहावं तेव्हा
आपलं थेंबे थेंबे
तळे साचे चालूच !

जरा कुठे खुटं झालं,
जरा समोरच्याचा सूर तापला,
जरा मुलाने उलट सूर लावला !

आपल्याच अपेक्षा
स्वत:बद्दलच्या
जऽरा हलल्या

पाऊस आपला
रपरप रपरप
चालूच !

अगदी डोळ्यातून नाही
पण मनात आपला
चालूच अभिषेक

म्हणतात ना
चाळीशीचं काही खरं नाही
खरच, हेच खरं !

२१.०५.२००५

Sunday, March 6, 2005

रिती !

तुम्हीपण
पाहिले, अनुभवले असतील असे गड !
ज्यांना चढण्यासाठी आहेत पायर्‍या अन शेजारचा
काहीसा खडबडीत पण सोपाच चढ !

माझ्या समोरपण आला असा एक गड - संसाराचा !

तुम्ही आणखी एक पाहिलंत ?
साधारणतः बायका चढतात पायर्‍याअन पुरुष चढ !

तर मी ही गड चढायला लागले.
अर्थात तोही होताच बरोबर !
मी आपली प्रेमवेडी,
हात धरून पायरी चढायला
पुढे केला हात...
अन त्यानेही हसून धरलान की हो हात !

मी मोहरले.
अन आत्मविश्वासाने, त्याच्यावरच्या प्रेमासह
खाली नीट पाहून
चढू लागले
पहिली पायरी !

अन मला त्या पायरीवर कितीतरी गोष्टी दिसल्या.
नवे घर, त्यातल्या नव्या रूढी-परंपरा, सवयी, आवडीनिवडी,
नवी माणसं, नवी नाती, त्यांच्या नव्या अपेक्षा.....
बाई, बाई, कित्ती गोष्टी वाट पहात होत्या, माझ्यासाठी !
मी पुन्हा मोहरले.
भरभर त्या सगळ्या गोष्टी नीट मांडू लागले.
मनाजोगत्या, मनापासून ठेऊ लागले..
कधी वर्ष सरलं कळलच नाही की... !

मग दुसरी पायरी !
तिथे तर माझं सर्वस्व भेटलं मला !
माझं बाळ !
त्याची अंगडी, टोपडी, लंगोट, दुपटी, ...
दूध, खेळणी, फॅरेक्स, ...
अबब केवढ विश्व उभं केलं मी माझं !

मग पुढे होत्याच पायर्‍या !
कधी बाळाचं हसणं, रडणं, पडणं, खेळणं, ...
त्याचे कपडे, बूट, शाळा, दप्तर, अभ्यास, ...
कधी आजारपणं -
बाळाची, बाळाच्या आजी - आजोबांची.
कधी माझ्या नोकरीतल्या जबाबदार्‍या.
आला - गेला, पै-पाहूणा, लग्न- बारशी- मुंजी.

सगळ्या पायर्‍यांवरचे हे पसारे
किती मन लावून, मनाजोगते रचत गेले.
सुखावत गेले.
वाटलं, माझा तो,
माझ्या त्याची माणसं
किती सुखावताहेत !

आणि कशी कोण जाणे
पंधराव्या पायरीवर चढताना
थोडी थकले बरं का !
स्वतःला म्हटलं,
" अंमळ श्वास घे थोडा.
सारखी चढण चढून लागतो थोडा दम.
अन आता अपरिहार्य अशी
कामंही थोडी कमीच झालीत.
थांब थोडी ! "

त्याला विचारावं , सांगावं
म्हणून मान वर केली ...
अन गोंधळले थोडी,
तो आहे कुठे ?
अन हसूच आले.
" अगं तो पुरूष !
तो थोडाच तुझ्यासारखा
पायर्‍या चढणार आहे ?
पहिल्याच पायरीवर
तुझाच हात धरून
तो वर नाही का चढला ?
तो मजेत गेला बघ
चढावरून - टणाटण !

अरेच्च्या !
त्याच्या वाटच्या
सगळ्या संसारातल्या गोष्टी
त्याच्या चढावर
राहिल्याच नव्हत्या मुळी !
त्या आपल्या घरंगळून
आल्या होत्या माझ्या पायर्‍यांवर !
अन मी वेडी
त्या सगळ्या माझ्याच म्हणून
भरभर, भर्भर करत आले की !

मनात आलेलं बोलायला
पुन्हा जरा अधिकचं मान वर करून
त्याच्याकडे पाहिलं,
तर ,
हातातली काठी नाचवत म्हणाला ,
" अगं चल लवकर.
किती वेळ लावतेस.
एवढा काठीचा भार घेऊन
या चढाच्या अवघड, खडबडीत रस्त्यावरून
मी भरभर वर आलोय.
आणि तुला साध्या पायर्‍या चढायला इतका वेळ ?
चल लवकर.
आणि आपलं झेंड्याचं कापड ?
आपला सुखी संसार,
लोकांसमोर आदर्श दिसायला नको का?
चल आटप लवकर.
दे ते झेंड्याचं कापड ! "

" अन मी ,
आपल्या झेंड्याच्या कापडावर
प्रत्येक पायरीवरचे तारे
शीवत शीवत धावतेय
तुझ्याही जबाबदार्‍या पार पाडत ,
त्याचं रे काय ? "
माझा स्वर झालाच थोडा
रडवेला,
कापरा,
अन तापलाही थोडा !

" तुम्ही बायका ना
प्रत्येक बाबतीत रडता,
कटकट करता,
अन तक्रारी करता !
अगं मी नाही का
हा काठीचा भार घेऊन
या अवघड रस्त्यावरून
चढून वर आलो !
चल,
फार भाऊक होता बुवा तुम्ही बायका ! "

मी हातातल्या किती निगुतीने
सारे तारे जडावलेल्या
झेंड्याच्या कापडामध्ये
शोधत राहिले
माझ्या खुणा !
पण जितकं शोधावं तितकं
प्रत्येक तारा आपला
त्याचेच नाव लावणारा !

कसे बसे त्याच्या हातातल्या काठीत
अडकवले ते झेंड्याचे कापड.
मग त्याने ,
अत्यंत जबाबदार व्यक्तीप्रमाणे,
कृतकृत्य होऊन,
तो, झोकात फडकविला की
गडाच्या माथ्यावर !

मी आपली खालीच
पायर्‍यांवर.
रिकाम्या ओंजळी,
झिजलेल्या तळव्यांनी
कशीबशी स्वतःला सावरत,
'कोणी पहात असेल तर '
असं वाटून
हसरा चेहरा करून उभी !
अंतर्बाह्य
पूर्ण रिती !
पूर्ण रिती !

२०.०३.२००५

Saturday, July 26, 2003

सोस

"माझा फुलांचा ताटवा"
किती जणांची,
किती रुपांची,
किती त-हांची... फुले ...
हा सारा ’माझा’ ताटवा ... !

काही सुगंधी
... अगंधीही.
काही सुबक
... थबकही.
काही रंगीत
... बेरंगीही.
काही सपर्ण
... अपर्णही.

पण सगळा माझाच ताटवा !

Friday, July 25, 2003

निवडूंग आणि त्याचे फूल

आधी वेदनेचे बीज
अगदी मनाच्या सात कप्प्यांआड
रुजावे लागते;
फुटणारे धुमारे त्याचे
आवरावे लागतात, सावरावे लागतात !

त्याची पानं
बाहेर पडू देता कामा नये....
वेदनेच्या झाडाचे
असे अश्रूभवन
होता कामा नये !

त्याचे हिरवेपण
जपण्यासाठी
पाने सगळी गिळून
आतल्या आत त्यांचे
काटे करावे लागतात
मधून मधून खुपले तरी
साजरे करावे लागतात....

निवडूंगाचे झाड
हे असेच वाढवावे लागते!

आलेच कधी फूल
तर तेव्हढे मात्र
हळूच हळूच
बाहेर पडू द्यावे...
एखादी तरी कविता
उमलतेच ना ?

निवडूंगाने मात्र
फुलत राहावे
आत, आत
अगदी सात कप्प्यांआत.... !

Monday, March 3, 1997

नशिब


समोरच्या राशीतलं फक्त पसाभरच माझं !
मग माझं मी निवडावं कसं ?
निवडक घेतलं तर सर्वांगी आवाका येत नाही.
सर्वांगी घेतलं तर वैशिष्ट्यपूर्ण होत नाही.
दोन्ही घ्यायचं तर पसा पुरत नाही.
निकं सत्त्व घेतलं तर गर गळून जातो.
गर घेतला तर सालाचे रंग येत नाहीत.
किंवा कित्येकदा निकं सत्त्व गर पचतही नाही.

शेवटी काय ?
आपला पसा आपणच पसरायचा !
आणि, आपणच ठरवायचा !
आणि, ठरवायचं
पश्यात आलेलंच आपलं मानायचं !

३.०३.१९९७








Monday, October 21, 1991

कठीण करून टाकतोस ...

कैद करतोस
माझे शब्द
तुझ्या स्पर्शाच्या
वळणांनी
नि फुलवतोस
अबोलीचे वन

माझ्याजवळचे
सारे स्पर्शमणी
काबीज करून
हवे तसे झुलवून

माझ्या बंद पाकळ्या
पुरेपुर सुगंधीत करून
कठीण करून टाकतोस
सारं काही ...
काठावर उभं राहणं,
झोकून देणं ...
वा
वाहून जाणं ही !


Tuesday, October 15, 1991

रे... (२)

तुझा ठेवा,
तुझ्याच साठी जपताना
हरवणार्‍या, मोहाच्या ह्या
केव्हढ्या रे वाटा?

म्हटला तर तुझाच हक्क.
पण तरीही मोह ठरावा.
तू ही हे समजून आहेस.
पण मर्यादेच्या
तुझ्या पायर्‍या अन माझ्या...
त्यांचा ताळेबंद मांडताना
होणारी एक पुरेवाट !

माझ्यातल्या स्वच्छंद परीला
अनेक परींनी आवरावे लागते.
त्यात तुझ्या उडणाऱ्या पावलांना
रेशमी बंधात ठेवावे लागते.
अन तरीही तुझ्यामाझ्यातला
अतुट हळूवार बंध वाढावा
म्हणून शोधलेल्या आडवाटा... !

प्रश्न केवळ विश्वासाचाच असता,
तर केव्हाच उधळला असता,
तुझाच ठेवा तुझ्यावर...
पण
संस्काराची बंधनं
ना तु झुगारलीस ना मी
रे ....
हीच आपली वहिवाट !