Monday, October 17, 2016

तुझ्या विना...

(थँक्स टू प्राची : ) )

आसवांचा लोटला
नयनी महापूर हा
बरसुनि मेघ सारे
तरीही उमाळा उरे

अंधुकली सृष्टी सारी
हुंदका ओठांवरी
गहिवर शब्दांवरी
बोलल्या वाचूनही

अधरी थरथरत्या
गाज नावाची तुझ्या
गात्रातुनि अधिरता
अपूर्णता तुझ्याविना... तुझ्याविना

Saturday, October 15, 2016

साकार तू!

चित्र जरा काढावे म्हणोनि,
           कुंचला माझिया हाती
           अन, रंग-सारे नयनी तुझ्या

घडवावी एक सुरई म्हणोनि,
                  चक्र माझिया हाती
                  अन, शाडुसम-मऊ स्पर्श तुझा

भरावा जरा कशिदा म्हणोनी,
               सुई माझिया हाती
              अन, रेशमी-गळाभर हात तुझे

रांधावे काही गोड म्हणोनि,
         तपेली माझिया हाती
         अन, उष्ण-ओले ओठ तुझे

विणावे जरा वाटले म्हणोनि,
           लोकर माझिया हाती
            अन, उबदार-घट्ट मिठी तुझी

गाणे जरा शिकावे म्हणोनि,
             सूर माझिया कंठी
             अन, रियाज सोबतीचा तुझ्या

सूर जरा छेडावे म्हणोनि,
       सतार माझिया हाती
       अन, षड्ज त्यातून साकार तू

Monday, October 10, 2016

लख लख

वाईचा कृष्णाघाट
त्रिपुरी पौर्णिमेची रात
तू आणि मी आणि
कृष्णेच्या गाभ्यातल्या
किती साऱ्या आभा ...

मिणमिणणाऱ्या पणत्या,
आकाशातल्या तारका,
अन कृष्णे मधे उतरलेले
त्यांचे मंद मंद
प्रतिबिंब...

तुुझ्या - माझ्या डोळ्यामधे
ज्योती तेवणाऱ्या
आसमंत मनातला
कसा जादुभरा
करी लख लख!

सोबत

कॉलेजच्या कट्यापाशी मी
अन समोरून आलास तू
थबकलास...

नजरेनेच विचारलस
हे काय?
लेक्चरला नाही येणार?

मैत्रिणींसाठी थांबलेली मी
उठून कधी चालू पडले
कळले नाही मलाही

आता नुसत्या तुझ्या
नजरेची सोबतही
पुरते मला!

काही वेगळच...

धो धो पाऊस
विजांचा कडकडाट
भरून आलेला अंधार
वेढून टाकणारा गारवा...

तशीच थोडी भिजत
थोडी थरथरच
थोडी कापत
मी वर्गात शिरले

वर्गात फक्त तू,
तू ही भिजलेला...
रुमालानी तोंड पुसत
तू वर बघितलस मात्र...

अन त्या एका क्षणात
तू काही वेगळच शिकवत गेलास
अन मीही शिकत गेले
काही वेगळच...!

पुरेसं

पायवाट नेहमीचीच
फक्त पाऊस...
तो, वेगळा होता

तू थोडा पुढे, मी मागे
अन मधेच एक
छोटासा ओहोळ

मागे वळून,समजून
तू नुसता हात
पुढे केलास

बस, तुझं नुसतं
तिथे असणंही
पुरेसं होतं

सगळं...
अगदी सगळं
पार करायला!

Saturday, September 17, 2016

आनंद सोहळा

( एका मैत्रिणीचा अनुभव मनात असा उमटत गेला...)

पहिले दिसले ते
तुझे लुकलुकणारे डोळे
हळूच किलकिले करून पाहिले होतेस
तू पहिल्यांदाच मला
अन मी टिपली होती
त्यातली  सारी उत्सुकता
मला पाहण्याची, समजून घेण्याची

मग हळूहळू आली तुझ्या नजरेत एक ओळख
एक ओढ, एक हास्य, अन कधी पाणीही
पण कधीच उठला नाही
एकही स्वर,  एकही खिदळणं वा एकही हुंदका
सगळे हसू, आनंद, रडू, राग
सगळं सगळं चेहऱ्यावर उमटे
पण व्यक्त होणं नव्हतच कधी

हळू हळू तुझं अव्यक्त होणं
अंगवळणी पाडून घेतलं
पण पचनी नाहीच पडलं कधी
सतत कान आसुसलेले रहायचे
सतत चाहूल घेत रहायचे
प्रयत्न तर सतत सतत
नुसते प्रयत्न प्रयत्न प्रयत्न...

मग कधी तरी एखाद्या घट्ट मिठीतून
कधी थडाथडा मारलेल्या चापट्यातून
कधी झाडलेल्या लाथांतून
व्यक्त होत गेलास तू
कधी मला कळे, कधी नकळे
माझी, तुझी धडपड नुसती
कधी हसरी,कधी रडवेलीही
अगदी कधी हताशही

अन मग एक दिवस
अगदी नाहीच विसरू शकत
मी तो दिवस
एक नवीन तंत्र, यंत्र
त्याचा हात पकडून
मारलीस तू हाक, एेकू न येणाारी
पण पहिली हाक
त्या यंत्रावर व्यक्त होणारी

तुझी हाक पहिली हाक ... मॉम...

साऱ्या विश्वातला तो सुंदर अव्यक्त स्वर!
पोहोचला माझ्या पर्यंत
माझ्या आत आत
झिरपत गेला
पाझरत गेले माझे डोळे
अन तुझे डोळे?
ते तर आनंदाने
नुसते वाहात होते

त्या वेळची तुझी मिठी
जास्त घट्ट होती
जास्त समंजस होती
तुझ्या माझ्या संवादाचा
तो आनंद सोहळा होता
नवीन सुरू झालेला
अखंड वाहत राहणारा
आनंद सोहळा

- आरती

Friday, September 2, 2016

निळी राधा



भिजवू नको ना रे कृष्णा
निघाली बाजारी राधा

का छळिशी असा, कृष्णा
नवी वसने ल्याली राधा
भिजवू नको ना रे कृष्णा

गोपी भोवती साऱ्या, कृष्णा
गोप पाहती भिजली राधा
भिजवू नको ना रे कृष्णा

का रे मानत नाही,  कृष्णा
कशी जाईल घरास राधा
भिजवू नको ना रे कृष्णा

ना राहिले भान आता कृष्णा
तुझ्यातच विरघळली राधा
निळी राधा, घन:शाम कृष्णा
                 

Tuesday, August 23, 2016

सोबतीचा बंध

नाग मोडी
नदी वाहे
पाणी तिचे थंड

काळे काळे
ढग गच्च
ल्यालेली ती सांज

गार गार
वारा वाहे
झुळुक एक मंद

नाजुक साजुक
सायली तिचा
सवे अलवार गंध

काळे निळे
डोळे दोन
आपणातच धुंद

मऊ घट्ट
कर दोन
सोबतीचा बंध
         

Sunday, July 31, 2016

मळभ

भरून आलाय खरा, 
पण पडेल तर शपथ
भरून आलाय खरा, 
पण पडेल तर शपथ!

सारीकडे मळभ नुसते, 
वर वारा भर्र भन्नाट
धुमशान वादळ नुसते, 
राज्य धुळीचे आभाळभर
धुमसून धुमसून, गडगडून 
क्षितीजभर भरून आलाय, 
पण पडेल तर शपथ

मधेच गर्जत चमकतेय
लखलखती वीज एक
धडकी भरवतेय काळजात 
आला आला म्हणावं तर 
सर्रकन हुलकावणी देऊन, 
जातोय निघून सरळ
अन पडेल तर शपथ

ढगांचे ग्रहण सुटून 
मधेच कवडशांचे उन 
जणु मनातले सगळे 
मळभ दूर होऊन
वाटतं लख्ख लख्ख 
समजलं सगळंच
अन असं म्हणे पर्यंत 
परत परत मळभ
पण पडेल तर शपथ

भरून आलाय खरा,
पण पडेल तर शपथ!