Sunday, June 7, 2015

बदनाम पावसाळा


किती योजने धावतो, वाहतो
उरातले जडशीळ , साहतो

कुठे ना कोणी मजसी अडवतो
न झाड, न वल्लरी; शोधितो फिरतो

कडाका उन्हाचा, चढे उष्ण पारा
न सावली उरी , ना वाही गार वारा

पाहतो कधीचा, कोरडाच माळरान
कुठेही दिसे ना, घनदाट एक रान

सांग मी कुठे, कोसळू कसा
कुशीत मज घेण्या, दिसेना पसा

समजून घे, दोष तुझाच फक्त बाळा
उगा बदनाम होत असतो, पावसाळा
                   



Saturday, May 9, 2015

छाया शिल्प

(जपान मधे एका म्युझियम मधे एक दगडी पायरी जपून ठेवलीय. ज्यावर माणसाची आकृती कोरली गेलीय.  हिरोशिमाचा अणुबाँब पडला तेव्हा तो माणूस त्या  उष्णतेत क्षणात जळून गेला. दगडी पायरीही जळली पण त्या माणसाचीची सावली पडलेली  तिथली जागा कमी जळली , कारण त्या क्षणभरात तिथे  माणसाची सावली पडली होती. अन तितका भाग  वाचला. माणूस विरघळून गेला उरली फक्त सावली...)


(  छायाचित्र आंतराजालावरून साभार  )



मी उभा त्या पायरीपाशी
चालत होतो वाट जराशी
समोर होते कार्यालय अन
उतरलो, बस थांब्यापाशी

धावधाऊनी वेळ पाळण्या
बॅग घेऊनी उरापाशी
फक्त होता मधे एक तो
रस्ता, ओलांडून जाण्यासाठी

तिथेच उभा मी पायरीपाशी
वाट पाहत सिग्नलपाशी
तेव्हढ्यातच पण पाही वरती
शतसूर्यांचा लखलखाट गगनी

कल्लोळ उठे ठाई ठाई
लाही लाही साऱ्या शरिरी
जाणीव कुठली, आत नुरली
कोरीव छाया, मागे उरली

बंदिस्त  कधीचा पायरीतच मी
मी न, कोरीव छाया नुसती...
उभा कधीचा त्या पायरीपाशी
दिक्कालाचे छाया शिल्प उरी

Friday, January 16, 2015

कोठार


ये, ये, टेक डोके खांदयावर
टीप तुझे डोळे, मऊशार पदराने
सांग तुझी सारी, सारी कहाणी
बोलून टाक, मनातले सारे काही
हलके करून टाक, सारे बोचणारे
थोपटून घे थोडे प्रेमाने, हक्काने.

सारी सारी पानगळ, सोसेल ही धरणी
तुला हवा तो, सारा ओलावाही देईल
जगण्यासाठी, नवी उभारीही देईल
नव्या आशांचा, मृदगंधही देईल
तुझ्या सुखांचा, अविरत आशीर्वादही
अन, "मी आहे“, हा आश्वासक खांदाही.

फक्त एक करशील,
कधीतरी मागे वळून,
डोळाभर पाहशील?
उमललेली कोवळी पाने,
हळुच मला दाखवशील?
फुलणारी कळी,
आसुसून दाखवशील?
झळाळणा-या आनंदाचे
दोन किरण, परावर्तीत करशील?

कसय ना,
अडी अडचणीला, उपसावं लागतच कोठार;
पण नेहमी नेहमी, फक्त उपसायचं नसत;
कधीतरी, आपणच, भरायचही असतं;
है ना  ?

                    

Monday, May 19, 2014

शुभंकर

एकदा स्विकारलास ना

नदीचा जन्म

उतरलीस डोंगरमाथ्यावरून खाली,

खळाळत धावलीस कड्या, दरीतून 


कितेक झाडांना, शेतांना, गावांना,

पशुपक्षांना, माणसालाही

देत राहिलीस जीवन 


आणि प्रसंगी त्यांची पापं, लक्तरं, घाण

सगळं पोटात घेऊन

राहिलीस न धावत? 


धावत राहिलीस दगडगोट्यातून

कधी जरा विसावलीस घाटावर,

कधी जरा उधळ भूमीवर

पण तरीही पुढे सरकलीसच


ही कसली ओढ होती तुला?

कसले आकर्षण, कसला मोह

कसली घाई, कसला सोस

जन्मापासून धमन्यात तुझ्या

जोपासलास हा कसला वसा 


ना कसली तमा, ना कसली काळजी

ना कोणती माया, ना कोणता पाश

सोबत येईल त्याला घेऊन

धावत राहिलीस सदासर्वकाळ 


जो न आला सोबत

सहज सोडलास हक्क

ज्याच्या त्याच्या निर्णयाचा

राखलास यथायोग्य मान

पण तुकवली नाहीस कधीच मान 


कोणाचे शाप, कोणाचे नमस्कार

कोणाचं अर्ध्य, कोणाचे पीतर

कोणीचे दु:ख, कोणाचे जीवन...

सगळे सगळे स्विकारत

तू पुढे पुढेच, अविरत, चिरंतन 


अन आज, अन आज 

तू उभी, काहीशी पलटून

काहीशी थबकून

एक पाय पुढे, एक मागे 


कधी मागे न बघणारी तू

आज थबकून 

मागे पाहू बघतेयस

कसला संकोच, कसली भिती

कसली हुरहूर, कसले काहूर 


तू तीच

ओहोळ, ओढा, नदी, महानदी

तू तीच 

फक्त रूप बदलले

वाहण्याचे तर हेच श्रेयस

प्रवाहापरि रूप प्रेयस


हो पुढे तू आजही बिनदिक्कत

नदी ना तू , मग कशास हरकत

नाव बदलेल, रुप बदलेल

तरीही मर्म तेच असेल

चल हो पुढे तू, तू तर शुभंकर

नदी नव्हे तू; हो रत्नाकर!

Wednesday, May 7, 2014

आरसे


प्रेम म्हणजे नक्की काय असतं
न भांडता, प्रेमळपणे
एकाने दुस-याची मूळ मते, स्वभाव
बदलून टाकणे
की
वेळप्रसंगी भांडून तंडून
दुस-याला त्याच्या मता-स्वभावा प्रमाणे
वागू देणं

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
प्रेमळपणे आपल्याला हवे तेच
दुस-याला देणे
कि
वाद घालूनही, शेवटी
दुस-याच्या गरजा अन अपेक्षांनुसार
त्याला हवे ते देणे

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
प्रेमळपणे दुस-यावर हक्क दाखवत
आपली हुकमत गाजवणे
कि
वेळप्रसंगी पुढे ढकलून
दुस-याला त्याची वाट
चालायला लावणे

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
प्रेमळपणे एकमेकांचे पाय
एकमेकांत गुंतवून ठेवणे
कि
समजून उमजून, स्वेच्छेने
दोन वेगळ्या वाटा
सोबतीने चालणे

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
लोकांना दाखवण्याचे
सुखी संसाराचे
शो पीस असावेत
कि

एकमेकांना दिसणारे
सुखी जीवनाचे
असावेत आरसे




Wednesday, March 26, 2014

अगदी तेव्हाच

संपले पुस्तक होते राहिले, शेवटचे एक पान
पडाव होता दूर थोडाच, तुला त्याची आस

झिजलेल्या काळ्या धाग्याची, गळ्यामधे गुंफण
झाली होती भाळावरली, चिरी फिकी पण

पायाखाली रिती थोडी, अजून होती वाट
प्राणामधे शिल्लक होते, अजून थोडे त्राण

फांदीवर तगून राहिलेली, पिवळी एक शेंग
आलाच होता पडायला, अळूवरचा थेंब

चोचीमधे होता उरला, फक्त शेवटचाच घास
होतच आली होती पूर्ण, फिनिक्स पक्षाची राख

गळ्यात होते थरथरते, सुंदर एक गान
शेवटचीच होती मैफलीत, भैरवीची तान

शेवटचा अजून चालूच होता, एक श्वास 
चेह-यावरचा मुखवटा उतरला, अगदी अगदी तेव्हाच

Tuesday, March 25, 2014

आठोळी (?)


जिवावर उदार होऊन
वार्‍यावर स्वार होऊन
दिपवणार्‍या एका क्षणासाठी
आकांत लाटेवरच्या थेंबाचा !

त्याचेच नाते सांगताना
माझी मात्र घोषणा
"आयजीच्या घामावर
चमकण्याची... !"

३०.११.१९८६

Wednesday, February 19, 2014

गोधडी

फिरले मि दाही दिशा
रुजवली नाती नवी
जोड जोडले आप्त काही
पण भेटले ना मलाच मी

आत शोधते आज काही
रुजवते आज नवीन बी
खुणावते दिशा नवी
आशेस येई पालवी

मनातली धूळ जुनी
पुसूनी केली पाटी नवी
झाल्या गेल्या काळाची
शिवून टाकली गोधडी

टोचणा-या कित्येक गोष्टी
गुंफल्या एका मेकीतुनी
उरे न आता बोच कुठली
भोग सारे भोगुनी

गोधडी माझी सखी
उब देई, देई उभारी
संगती माझ्याच मी
शोधेन, भेटेन, मलाच मी

Wednesday, July 31, 2013

ये, सखये ये ....

तसे केव्हाच तुला बुडवले
डोहात, खोल खोल आत
तुझे गुदमरणे, तुझे हुंदके
अगदी गिळून टाकले कधीचे

जिवंतपणाचे लक्षणी बुडबुडे
वर येऊन फुटू नयेत म्हणून
त्या तळ्यावरच सा-या,
बांधून टाकली मोठी कबर;

सणसणीत व्यवहाराची, दिखाऊ, सुबक
त्यावरल रचले कित्येक साज, फुले
पण जाणीवपूर्वक,  शोभेचे.
फुलण्याचा शाप नको म्हणून

हुश्श्य...
मोठा श्वास घेतला, 
चला आता काळजी मिटली
एक मोठा उसासा टाकला,

अन झाले,
तू तशीच
पुन्हा वर,
जिवंत...

तशीच जलजळीत सत्य घेऊन,
भळभळणा-या वेदना घेऊन,
टोचणा-या संवेदना घेऊन.
अन सोबत,
माझ्या जिवंतपणाचा दाखलाही घेऊन

ये, सखये ये ....

Friday, February 1, 2013

जिवंत!


ओली जखम!

सुकली, खपलीही धरली
खपली सुकली; पडूनही गेली
व्रण,...तो ही झाला; 
फिका ... फिका

वाटलं
सारं शांतावलं
झाला त्या
वादळाचा अंत...!

अन एका
ऊबदार क्षणी
सारे भसाभस
ऊतू गेले

किती प्रयत्नांनी
वरून घातलेले
निर्विकारपणाचे खडक
पाझरले, वितळले

खाली तसाच;
तसाच्या तसाच
लाव्हा खदखदत
जिवंत!