Monday, June 27, 2011

रिता

माझी "रिती" ही कविता आठवत असेलच. त्याला हा वेगळा झब्बू स्मित
"त्याच्या" सगळ्या प्रेयसींना एकत्रितपणे त्याची प्रेरणा कल्पून ही सुचली.........


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
भेटलीस तू मला
पण नाहीच देऊ शकलो,
साथ मी तुला

बालपणीच्या निरागस प्रवासात,
भेटलीस होऊन राधा
सोडून जाताना घेतला नाही,
निरोप सुद्धा साधा

करून सारे समर्पण,
बनलीस माझी रुक्मिणी
सुख्-दु:खांच्या तराजूत,
झालो फक्त तुळशी

तारुण्याच्या मखमलीत,
भेटलीस होऊन सत्यभामा
सोडताना फक्त लावून गेलो,
प्राजक्ताच्या झाडा

आयुष्याच्या उतरणीवर,
भेटलीस होऊन मीरा
दिला तुला प्यायला,
विषाचा एक प्याला

आयुष्याची इतकी वळणे,
चाललो अनेक वाटा
भोगले सारे सारे,
शेवटी पण मी एकटा

देणे सार्‍या आयुष्याचे,
पुरे फेडू जाता
तृप्त तुम्ही सार्‍या,
मी मात्र रिता !

Tuesday, May 17, 2011

घिर घिर आयी काली बदरियाँ

आज पावसाळी हवा भरून आली अन ही सुचली

घिर घिर आयी काली बदरियाँ
कहत संदेसवा, आयेंगे सावरियाँ |

उमड घुमड कर छायी है घटायें
दिल की धडकने लगी है सताने
कहत संदेसवा, आयेंगे सावरियाँ |

पवन दिवानी उडाये चुनरिया
घुंघट उठाये जैसे सावरियाँ
कहत संदेसवा, आयेंगे सावरियाँ |

झिम झिम बरसे बूंदे सावन की
जैसे बरसती है यादें सजन की
कहत संदेसवा, आयेंगे सावरियाँ |


अन ही मराठीतली

गच्च भरून आले जलद
ऐकू येतेय सजणाची साद |

नभ आले गडगडत
झाली कालवाकालव हृदयात
ऐकू येतेय सजणाची साद |

पदर उडवतोय वेडा वारा
जसा साजण पाही मुखचंद्रमा
ऐकू येतेय सजणाची साद |

बरसू लागले थेंब टपोरे
जणू आठवणींचे झेले
ऐकू येतेय सजणाची साद |

Friday, April 22, 2011

सृजनाचा सोहळा

आधी एक धून मनात हुरहुरत होती, मग त्यातून हिंदी शब्दच फुटले....


"बहारों ने इतना रुलाया है मुझ को
कई बरसातें बरस गई , यारों....

गुल खिले है इतने रंगीत सारे
के रंग जिंदगीका उजडा हुआ है

लदी हुई है टहनी, फलोंसे
पर नीरस हुई है जवान सॉसें

पेडों पर निकले है पत्ते बहार के
बस उजड गया है आशियाना यारों "

पण मग ती मराठीतही लिहिली...

वसंताने इतके रडविले, मला की
बरसूनी गेले, पावसाळे किती ....

फुलली फुले, इतुकी रंगीत सारी
की रंग माझ्यातले सारे, गेले विरुनी ....

फळांनी किती लवली फांदी, फांदी
की रसाळता सारी, आटुनी गेली ....

पालवी फुटे उतुकी , कोवळी कोवळी
की सृजनता सारी, शोषुनी गेली ....

Friday, February 18, 2011

चैतन्य !

चैतन्य माझा पहिला भाचा ! पुढच्या महिन्यात त्याचे लग्न... त्याच्या बालपणीच्या या काही गोड आठवणी...



अजूनही मला लख्ख आहे आठवण
तो दिवस... आणि तो क्षण...

सुरू झाली होती ऑक्टोबर हिट
अन दुपारच्या भर उन्हात, गरम होती गाडीची सीट
धावतच चढले जिना तो उभट,
नर्सने दाखवले एका दिशेला बोट
खोलीत मी त्या घुसले थेट,
आत होता अंधार दाट

अन क्षणात दिसलास मला तू .....
पडद्याच्या झिरपणार्‍या मंद प्रकाशात, जाळी आड झोपलेला तू
गुलाबी कापसाची नुकतीच उमलेली कळी जणू तू
सुदृढ,सतेज,सुकुमार,गुलाबी गोरा,गब्दुल, गोंडुस तू
आमच्या घरातले पहिले बाळ तू
आमच्या घरी आलेला चैतन्य तू.......

अन मग घरी तू आलास.
आतापर्यंत न आवडणारा, धूपाचा वास
तुझ्या सान्निध्यात,मात्र झाला सुवास

आठवतात तुझे चमकणारे डोळे
तळपाय तुझे गुलाबी,गोबरे ;
सतत चुळबुळणारे हातपाय तुझे
अन हो, अगदी तुझे ओकरे बाळसे....

कधी आईचे केस हातात धरून झोपणारा तू
कधी बाबांच्या स्कूटरवर पुढे उभा राहणारा तू
कधी 'आबा काय करता' म्हणत त्यांच्यामागे फिरणारा तू
कधी आजीची लांब वेणी धरून तिच्या मागे लुटुलुटु फिरणारा तू
कधी मावशीबरोबर ऑफिसला जाण्याची स्टाईल मारणारा तू
कधी माझ्या केसांना गालावर घासण्यासाठी पाठीमागून गळ्यात पडणारा तू

तुझ्यासाठी तयार झालेली माझी, पिटीक पिटीक माकडाची गोष्ट
अन तुझ्या सोबतीने म्हटलेली कित्ती कित्ती बडबडगीतं
खेळलेले खेळ अन केलेली बाष्कळ बडबड
अन आठवतं
हे सगळे करताना पुरेपुर उसळणारे तुझं
चैतन्य........

मग आठवतोस तू ,
मी पहिली शिवलेली वीतभर उंचीची फुलपँट;
अन तळहाताएवढा फुलशर्ट घालून टकामका पाहणारा तू
मग छोट्या अमेय बाळा कडे कुतुहलाने बघणारा तू
नंतर राहूल बाळाला मांडीत घट्ट पकडून बसलेला तू
मधुराचा झालेला जबाबदार दादा तू
अन चुळबुळ्या, चिडक्या , रागीट निखिलला कडेवर घेणारा तू......

कधी आठवतोस राहूल बरोबर, चिक्कू-आंब्याच्या झाडांवरून उड्या मारणारा तू.
तर कधी आठवतोस, लांबलचक फुलांची माळ घेऊन हॉलभर लुटुलुटू पळणारा तू.
कधी आठवतोस काळ्या सिल्कच्या मधला, तर कधी लालभडक गंजीतला तू.
कधी आठवतोस हिरव्या झब्ब्यातला, "शिष्ठ" पणा दाखवणारा भलताच गोंडूस तू.
तर कधी पायर्‍यांवर, थंडीतल्या उन्हात, आमच्याबरोबर शेकत बसलेला तू.

कधी आठवतोस तू, झालेला बनी रॅबिट
खरा रॅबिटही कधी दिसला नाही; तुझ्याइतका क्यूट.
कधी आठवतोस शाळेतल्या ड्रेसमधला तू,
तर कधी गॅदरिंगमधल्या नाचातला तू.
कधी आठवतोस कापलेल्या केसांची वेणी रागावून फेकून देणारा तू
अन कधी चिकनची तंगडी मन लावून खाणारा तू.

अन मग गेलास वर्षभर त्या लांब लांब देशात तू.
फोनवरून 'हॅलो माई' म्हणणारा तू
अन तीन मिनीटात फोनमधून भेटायचा प्रयत्न करणारे आम्ही.
आईच्या खुप मोठ्या पत्रांतून अन त्यातून येणार्‍या फोटोंतून
पाहिले आम्ही वाढताना तू

अन मग तू आलास; दिसलास एअरपोर्टवरती
धावत येऊन, उडी मारून; घट्ट मारलीस मिठी
आजही आठवते, डोळ्यात आणते पाणी
पाच मिनिटं ती तुझी , माझ्या जन्माची सोबती

Thursday, December 23, 2010

फिरव पाठ


दे शिव्या, दे लाथा, त्याच त्या माणूसकीला
कर ओरडा, पाठ कर त्याच त्या माणूसकीला !

लोकल आली, ढकल याला, ढकल त्याला
धक्का दे म्हातार्‍याला, सरकव त्या पोराला
पकड जागा, फिरव पाठ त्याच त्या माणूसकीला !

नोकरी आली, भर फॉर्म, काढ ओळख
बाकीच्यांचे फॉर्म फाडून, हो तट्टू वशिल्याचा
मिळव पैसा, फिरव पाठ त्याच त्या माणूसकीला !

संधी आली, पकड पकड, पटव ती
पुरव पैसा, लाव ओळख, दे वजन वरती
हो बडा, फिरव पाठ त्याच त्या माणूसकीला !

जग असाच शेवट पर्यंत, शेवटची संधी सोडू नको
चित्रगुप्ताकडे गेल्यावरही, जप तुझा निलाजरा प्राणी
दुसरा जन्म घेताना तरी, फिरव पाठ त्याच त्या माणूसकीला !

७.०६.१९८६

चोरी


झाकणं तशीच ठेऊन
यंत्रांची चोरी झाली
ती कोणालाच कळणार नाही;
कारण ............
झाकणं कोणीच उघडणार नाहीत !

झाकणं तशीच ठेऊन
यंत्रांची चोरी झाली
ती कोणालाच कळणार नाही;
कारण ............
आता तिथे झाकणंही उरली नाहीत !

२५.०८.१९७९

Wednesday, December 22, 2010

बे वफाँ

उस तसवीर को लेकर क्या किजे
जो आखोंको सजाँ देती है
इस दिल में बसी तसवीर का क्या किजे
जो दिलको जला देती है
हमारी कदमों के छालों का
खयाल करते थे जो कभी
इस दिल की छालों का भी
खयाल नहीं आज उन को
न मिली मुहोब्बत किसी की
न मिला प्यार उन का
हम जलते रहे, ढुंढते रहे
निशानी हर चिराग की
इस चमन में इक बहार
आयी... चली गयी
वो भी चल पडे, दिल को
यादों के सहारे छोड गये
बस इक बार छेड गये
इस दिल की तारों को
वो ही बजाते रहे हम
सूर,सारी जिंदगी भर


 रुपांतर...

या चित्राला कवटाळून काय करू,
जे छळिते डोळ्यांना
मनात भरलेल्या या चित्राचे काय करू,
जे जाळिते मनाला
माझ्या पावलांना बोचण्याची,
काळजी होती ज्यांना
आज ह्रदयाला बोचण्याची,
काळजी नाही त्यांना
नाही मिळाली सोबत त्यांची,
ना मिळाले प्रेमही
जळतच राहिले या जीवनी मी,
फिरते विराणी
या बागेत फक्त एक बहर;
आला...... निघोनी गेला
तेही निघून गेले आठवणीं सोबत,
मज सोडून गेले
हळूवार छेडूनी गेले,
मम ह्रदयीच्या तारा
तेच सूर आळवते मी,
आयुष्यभर सार्‍या

Saturday, November 13, 2010

खरेतर जगणे हाच, आनंद असतो

फक्त एका क्षणाचा, हिशोब चुकतो
आयुष्याचा सारा, आलेखच बदलून जातो

गाडीतून जाताना, फलाट लांब रहातो
फडकता रुमाल, फक्त हातात रहातो

आधाराचा हात, हातात असतो - नसतो
सोबतीचा आभास, फक्त मनासाठी असतो

प्रत्येक क्षण काही, आपला नसतो
आपला क्षण, आपणच शोधायचा असतो

फक्त एकच निमिष, आपला असतो
त्यातच सारा अर्थ, मानायचा असतो

जन्मभर आनंदाचा, शोध घेत असतो
खरेतर जगणे हाच, आनंद असतो.

Saturday, October 23, 2010

मरणाचा सोहळा

वहायचा अखेर होता
क्रूस एकट्यास
शोधले कशास खांदे
तिरडी बांधण्यास

दिली अनेक वचने
गेली वाहण्यात
केले कित्येक बहाणे
शब्दात जागण्यास

गेले आयुष्य सारे
आधार मागण्यात
बदलले हरेक नाते
अखेर तुटण्यात

लागला कशास रुमाल
आसवे पुसण्यास
बाकी न राहिला काही
आधार जगण्यास

आता झाली पुरी
कारणे मरण्यास
पाहतो आहे मीच माझ्या
मरण्याच्या सोहळ्यास

Tuesday, October 19, 2010

मैत्री कशी असावी ....

माझ्या सर्व मित्रमैत्रिणीना

मैत्री कशी असावी ....
पोळीहूनही लुसलुशीत ; जिभेला गोंजारणारी
दुधाहूनही स्निग्ध ; जिभेला मऊसूत करणारी
दह्याहूनही कवडी ; जिभेवर टिकून राहणारी
तुपाहूनही रवाळ ; जिभेवर रेंगाळत राहणारी
श्रीखंडाहूनही निघोट ; जिभेवर मुरत जाणारी
चिवड्याहूनही कुरकुरीत ; जिभेला सोकवायला लावणारी
चकलीहूनही खुसखुशीत ; जिभेला अतृप्त करणारी
पिठीसाखरेहूनही गोड ; जिभेवर विरघळत जाणारी
अन मधाहूनही घट्ट ; जिभभर पसरत जाणारी
मैत्री अशी हवी !

मैत्री कशी हवी ....
मोरासारखी नाचणारी ; निखळ आनंद देणारी
कोकीळेच्या स्वरात गाणारी ; सुखसंवाद करणारी
प्राजक्तासम नाजूक ; हळूवार सुगंधी पखरण
रातराणीसम गंधीत ; मस्त धुंद करणारी
प्रवाहासम वाहती ; हवी तिथे नेणारी
खडकाहूनी अचल ; खंबीर आधार देणारी
मेणाहूनी मऊ ; हवी तशी दबणारी
सोन्यासारखी झळाळणारी ; मैत्रीचा कस दाखवणारी
अन आरशासम पारदर्शी ; जणू तुमचीच प्रतिकृती
मैत्री अशी असावी !

मैत्री कशी असावी...
ढगांसारखी आपल्याच मस्तीत ; हवे तेथे भटकणारी
विजेसारखी लखलखून ; चकीत करून सोडणारी
पावसासारखी भिजवणारी ; प्रेमात चिंब करणारी
न दुभंगणार्‍या पाण्यासारखी ; सलग, सजग, निखळ वाहती
वार्‍यासारखी स्वच्छंद ; बंध मुक्त करणारी
उन्हासारखी चमचमणारी ; लख्ख लख्ख उजळवणारी
इंद्रधनुसारखी सप्तरंगी ; जीवनाला रंगवून जाणारी
सावलीसारखी शीतल ; जणू मायेची पाखर
धरतीसारखी सृजन ; एक एक बी फुलवणारी
मैत्री अशी असावी !