कॉफीची टेबलं आता मोकळी पडली आहेत
तिथला बुद्धीला चालना देणारा दरवळ
खोल खोल दडपला गेला आहे
कॉफी शॉपमधली एकूणच ये जा मंदावली आहे
रस्त्यावरच्या पहारेकऱ्यांच्या सावल्या हलताना दिसताहेत
क्षितिजावरचे काळे ढग भराभर पुढे सरकत आहेत
लेखकांच्या लेखण्यांवर केशरी राप चढला आहे
अन पानांवर आधीच ..नामाची छपाई झाली आहे
शाळा महाविद्यालयांतून घोकंमपट्टी ऐकू येते आहे
पुस्तकांच्या दुकानातली इतिहासाची पुस्तकं हरवली आहेत
प्रयोगशाळा तर कधीच्याच कुलुप बंद झाल्या आहेत
जुन्या पोथ्यांमधला न समजणारा मजकूर उद्घोषित केला जातो आहे
प्रत्येक विचारी मेंदूवरती परंपरेचा झिरझिरीत पण प्रभावी पडदा सरकवला गेला आहे
सुख समृद्धीच्या चंगळवादाने विचारांवर आपले जाळे पसरले आहे
चार भिंतीतील माझं सुरक्षित जग जोपासलं जातं आहे
त्या घरांचा पाया मात्र खोल खोल रुतत चालला आहे
क्षितीजावरचा सूर्यही हळूहळू दृष्टीआड होतो आहे
उद्या कसा उगवेल, उगवेल तरी का
असा प्रश्न पडणारी माणसं ही हरवत चालली आहेत...
---