Friday, September 27, 2024

प्रेम म्हणूनि गाईले

जाहल्या काही चुका अन्‌ शब्द काही बोललेले

तू दिलेले दु:ख सारे, प्रेम म्हणूनि गाईले

प्रेम भरल्या त्या दिसांचा, आठव जागा आजही
एकटीने झेलते आघात सोयऱ्यांचे, कधीची
त्या क्षणांना साद घालीत, संसार सारा ओढिते
तू दिलेले दु:ख सारे, प्रेम म्हणूनि गाईले...

होईल सारे नीट अन, पार करेन भवसागरा
आशा ही लावुनिया हृदया, मी कधीची धावते
मी असे सर्वस्व माझे, तुलाच रे वाहिले
तू दिलेले दु:ख सारे, प्रेम म्हणूनि गाईले...

आज हवा आधार मजला, सांग तू देशील ना
प्रेमभरल्या आसवांना, तू कवेत घेशील ना
साथ लाभावी तुझी, साठीच सारे साहले
तू दिलेले दु:ख सारे, प्रेम म्हणूनि गाईले...
---

Thursday, September 12, 2024

माती

 माती,

आधी भिजते,

मिळून येण्यासाठी 

मळून घेते,

स्वत:चे एक एक 

अस्तित्व मिटवते,

तयार होते

नवीन रुप घ्यायला!

अन मग कुठे,

मूर्तिकार घडवतो,

सुंदर मूर्ती!

अन मग

मूर्तीला नमस्कार

मिळत रहातात,

माती,

माती, मुकीच रहाते...

---