![]() |
प्रकाशचित्र: सौजन्य : चैतन्य खिरे |
चहूकडे पाणी आणि कातळावर राणी
भरून आली मनामधे निळी निळी गाणी
काठावरले वृक्ष त्याची जळात साउली
हलती डुलती पाने, तिला त्याच्या चाहुली
रावा उडे इथे तिथे, करावया पाहणी
रंगुनिया प्रेमात ती, घरटे नाजुक विणी
पिल्ले दोन सानुली, जणु घरटे ओंजळी
लुकलुकु डोळे अन, मऊमऊ लव्हाळी
दिन सारा येर झारा, भूक पिलांची कोवळी
मायबाप देती घास, चोच जणु रोवळी
घंटा निनादे काठावरली, उंच राउळी
येई हळु विसाव्यास, रात्र निळीकाळी