Sunday, June 20, 2010

सावळ्या घना...सावळ्या घना जरा, बरसून जा
माझिया प्रियेला जरा, सजवून जा

हिरवा मखमली गालिचा, पसरूनी जा
रानफुलांच्या बिंद्या त्यावर, फुलवून जा

इंद्रधनुष्याच्या मखरी, मांडून जा
जलधारांचा धूसर पडदा, ओढून जा

कडाड वीजांचा ताशा, वाजवून जा
सावळ्या घना जरा, बरसून जा

माझिया प्रियेला जर, सजवून जा
विभोर तिच्या कुंतलांना, भिजवून जा

भांगात दवबिंदूंची बिंदी, लावून जा
पापण्यात स्वप्ने नवी रेखून जा

मोत्यांच्या थेंबांची कुंडले, अडकवून जा
श्वासात मृदगंधाचा सुवास, पेरून जा

लालिमा कुंकवाचा गाली, पसरून जा
मोत्यांच्या माळेसम थेंब, ओवून जा

निळी सावळी ओढणी, ओढून जा
उन्हाची किनार तिला, लावून जा

लाटांचे पैंजण पावलात, घालून जा
माझिया प्रियेला जरा सजवून जा

सावळ्या घना जरा, बरसून जा
माझिया प्रियेला जरा, सजवून जा

18.06.2010

No comments:

Post a Comment