Monday, August 8, 2011

पृथ्वीचे पाणिग्रहण !






जेष्ठातली उतरती सांज
उडू लागली धूळ त्यात
पसरली जणू आसमंतात
तव लग्नाची खबर-बात





मग केली गर्दी मेघांनी
गेले सारे आभाळ भरुनी
आच्छादन पडे, होई सावली
छे, हा तर मंडप दारी






वारा सुटला, सुटली पाने
पखरण पिवळ्या पानांची
धरती झाली पिवळी पिवळी
हळद लागली नवरीची






घुमु लागली वार्‍याची सनई
तडतड ताशा वीज वाजवी
गडगडाट घुमला नभांगणी
छे, ही तर लग्नाची वाजंत्री






थेंब टपोरे पडू लागले
मोत्यांच्या लडीवर लडी
पोचू लागल्या गावोगावी
तव लग्नाच्या अक्षत-राशी







मातीच्या ढेपेतूनी वर
येऊ पाहे हिरवे रोप
दोन्ही पाने देती आशिष
पुजते गौरीहर तु त्यास






उमलूनी येई, ही पहाट
साकळलेले धुके दाट
विप्र उभे धरूनी ताठ
दोघांमधला अंतरपाट






पूर्व दिशेला नभी अवतरे
सप्तरंगी इंद्रधनु ते
जणू सुगंधी सुमनांची
शोभे मुंडावळी कपाळी







हिरवी हिरवी हिरवळ त्यावर
रंगबिरंगी सुमने नाजूक
धरती ल्याली नवे रूप
छे, हा तर शालू हिरवा तव







गाऊ लागले मधूर स्वरात
सारे खग-गण एक सूरात
एका मागूनी एक गाई
मंगलाष्टके सुरू झाली






झर्-झर झर्-झर झरू लागले
डोंगरातुनी खळ्ळाळ झरे
निशीगंधाच्या शुभ्र तुर्‍यांचे
शोभती हार वधू-वरांचे






उभे मध्ये मेघांचे तोरण
हळूच बघे वर रवी एक क्षण
झाले सारे केशरी भू-वन
संपन्न होई पाणिग्रहण !

( हीच कविता अ‍ॅनिमेट केल्यावर अशी दिसली. ही कविता ’दिपज्योती दिवाळी अंक २०११, मध्ये प्रकाशित झाली )
 

No comments:

Post a Comment