Thursday, October 10, 2019

रे पावसा

का बरं इतका, कोसळतो आहेस
कुठे काय इतके, दु:ख पाहिलेस
काय इतके टोकाचे, तुला बोचलय
कोणाला इतकं, उणावतो आहेस
किती दिवसांचं काय, उतु जातो आहेस
का रे का इतका, भरभरून कोसळतो आहेस

सगळं सगळं अगदी, धुवून निघालं रे
सगळी लक्तरं आणि भांडीकुंडी घरे
सगळं सगळं वाहून, घालवलस रे पार
सारी लाज भिड, उतरली पार
उघडी पाडलीस, पालं अन पाठ
का रे का जीवघेणा,  कोसळतो आहेस

थांब रे थांब आता, संपली सारी ताकद,
संपला सगळा आव, ना उरला धीर,
कुठे कसा कसला, सांग बांध घालू
कुठे कसा कशाने, सारे कसे सावरू
कोणते शब्द आणू, कोणते हात देऊ
कोणत्या हाताने, डोळे किती पुसु
का रे असा उफाळून, कोसळतो आहेस

मान्य अगदी मान्य, झाल्या चुका खुप
बांधले बांध, आवळले नदीचे तीर,
झाडांचे कापले शेले, बोडके डोंगर,
कसे विसरलो, निसर्गाची नाळ
तूच आता त्राता, तूच थांबव आता
पुरे हा आकांत, आमचा अन तुझा

Tuesday, October 8, 2019

सुरकुत्या



मला नाहीच भावत फारसा
तुकतुकीत, नितळ, तजेलदार
चेहरा, त्वचा, अगदी व्यक्तीही.

ना कळतं व्यक्तित्व, ना विचार
ना प्रेम, ना आस्था, ना लागणी
व्यक्त होणं, अगदी निर्विकार

तुलनेत रेषां कशा सांगतात सर्व
काय काय सोसलं, कसं, किती,
सोसतानाही पचवलं, अगदी हसत

प्रत्येक सुरकुती जोडत जाते
त्याला न मला एकेका धाग्याने
कळत जातो तो, अगदी खराखुरा

त्याच्यातलं माणूसपण झिरपतं
त्याची माझी नाळ विणली जाते
भिजवत जाते आत, अगदी मनात