Friday, August 9, 2019

कबर

डोक्यावर घट्ट ओढून घेतलीय,
काळीशार खरबरीत घोंगडी.

आरवणाऱ्या सगळ्या कोंबड्यांच्या,
घट्ट बांधून ठेवल्यात चोची.

उमटू पहाणारी सारी अक्षरं,
त्यांच्याच शाईत पार बुडवून टाकली.

कानाचे पडदे शिऊन टाकलेत,
आतल्या शिरांच्याच धाग्यांनी.

सतत जागं होऊ पहाणाऱ्या मनाला,
टाकलय पार गाडून अंधाऱ्या बावी.

आणि आता शांतचित्ते वाट बघत उभा,
बघु उजाडतोच कसा तो, सूर्य...जाणीवांचा!