Monday, June 10, 2019

सर्वश्रेष्ठ साहेबाची सर्कस



आमच्या लहानपणी न,
खरीखुरी सर्कस असायची.
प्राणी, पक्षी, माणसं...
त्यांच्या कौशल्याची सर्कस;
त्यांच्या धीटपणाची सर्कस.
आणि आम्हाही अगदी
प्राण डोळ्यात आणून
बघायचो ती.

कधी टाळ्या, कधी ओरडा
तर कधी अगदी शिट्याही
मारत काही लोक.
वाघा, सिंहाच्या डरकाळ्या
रिंगमास्टरचा चाबूक
वाघासिंहाचे शेळी बनून
स्टुलावर बसणे
शेळीसोबत जेवणे.
अगदी आगीच्या गोलातून
झपकन उडी मारणंही!

उंच पाळण्यावरच्या कसरती
हात सोडून हवेतच
इकडून तिकडे उडू मारणं
झोक्याचा हात सोडून
कोलांटी उडी मारून
दुसरा झोका झपकन पकडणं...
काळजात धस्स व्हायचं.
त्यातून त्या कमनीय बांध्याच्या
रंगलेल्या गोऱ्या ललना
कमावलेले शरीर असणारे
तरणेबांड सौष्ठववीर
सारं कसं डोळे दिपवणारं
काळजाची लकलक वाढवणारं!
विविध रंगी पक्षी
ससे, उंदीर, माकडं
त्यांनी चालवलेल्या
इटुकपिटुक गाड्या, सायकली
तोफेतून डागली जाणारी माणसं
अन सगळ्यांना हसवणारे
रंगिशिगी, कोलांट्या वीर
ढुंगणावर चटअॅक पट्या खाणारे
दोन चार अतरंगी विदुषक!

काय धमाल यायची
त्या साडेतीन तासात.
सर्कशीचा ते झगझगीत गोल
त्यातली न्यारी दुनिया
सगळेच कसे
अचंबित करणारे!

संपले ते बालपण
संपली ती सर्कस
प्राणिजगतावरचे
वाचवायला संकट
आले नवे नियम
सरसावले प्राणिप्रेमी!

अन मग
अन मग आली
नवीन सर्कस

सगळ्यांच्या घराघरात
टिव्हीमधे रोज आदळू लागली
सर्वश्रेष्ठ साहेबाची सर्कस!

जाहिरातींच्या प्रॉडक्टमधून
जनतेनेच विकत घेतले तिकिटे
रोजचा रतिब, रोजचा नवा खेळ
काही अरेरावी लोकांच्या डरकाळ्यी
उन्मत्त सुंदरींचे तोंडपट्टे
अतरंगी स्वभावाचे विदुषक
टास्कच्या नावाखाली केलेले राडे
एकमेकांच्या उरावर बसून
केलेली शिवीगाळी, उठवलेली राळ
आणि विकएंडच्या डावात
जिभेने झोडपणारा रिंगमास्टर

जनता चकित, बेभान
साडेतीन महिन्यामधे
रोज चालणारी ही सर्कस
डोळे विस्फारून बघतेय
गलेलठ्ठ पैसे घेऊन
सर्कस करणारे उत्तम नटनट्या
सोलताहेत एकमेकांना
अन ते पहात हृदयशून्य
जेवत, खात तुटून पडतेय
भाकड चर्चेत चवीचवीने.

कुठे गेली ती माणूस जमात;
प्राण्यांवरही दया दाखवणारी?
बहुदा प्राणीप्रेमींसारखे
माणूसप्रेमी राहिलेच नाहीत आता.
किंवा असेही असेल
प्राण्यांइतकीही किंमत
राहिली नाही आज
माणसाची...

तर, चालू आहे
सर्वश्रेष्ठ साहेबाची सर्कस!

No comments:

Post a Comment