Saturday, December 2, 2017

हे पण हवं, तेपण हवं...

हे पण हवं, ते पण हवं
इथे पण गुंतायचय, तिथे पण
हे पण बघायचय, ते पण
सगळंच सगळंच हवय
ह्याचीपण तक्रार आहे, त्याचीपण
अडचणी सारख्या, सगळ्याच्याच
सहानुभूती हवी, सारखीच
सगळ्यांकडून,अन सतत
मी, मी, आणि फक्त मीच
लक्ष द्या, वा वा म्हणा,
आईग म्हणा, बिग हग म्हणा
फक्त मला, मला, मलाच
पण वेळ मात्र देणं नाही,
कशालाच, कोणालाच, कधीच...
पूर्णत्वानं झोकून देणंही
नाही, नाही, नाहीच
बयो, बस झालं,  बस थोडं
थांब थोडं, आत बघ थोडं
श्वास घे थोडा, खोलवर
मोठी हो ग, मोठी हो
कोणी येऊन नाहीच करू शकत
तुला अचानक जादुने मोठं
आपलं आपणच व्हावं लागेल
तुझं तुला मोठं
आहे त्यातूनच शोधावा लागेल
तुझा मार्ग, तुझ्याच साठी
तुझा आनंद, तुझं समाधान
तुझं तुलाच शोधायचय
ह्याच्या, त्याच्या, कुबड्या घेत फक्त
नाही ग येणार वाटचाल चालता
त्या धरायला किमान लागणारेत
तुझेच खांदे, तुझीच ताकद
ओळख हे, लवकरात लवकर
हे सांगणारेही चाललेत पांगत
छाटत चाललीयस आधार
पुढे आहे एकाकी रेत...

पसरलय विस्तीर्ण आयुष्य
ठरव, हवीय आभासी हिरवळ
की खरीखुरी, हिरवीगार, शांत
प्रेमाची, विश्वासाची पाखर!

No comments:

Post a Comment