Wednesday, December 20, 2017

प्रत्येकाचा, ज्याचा त्याचा...

प्रत्येकाचा, ज्याचा त्याचा
आपला आपला कृष्ण

वादळ भरल्या यमुनेला
पदस्पर्शाचा कृष्ण
यशोदेच्या पान्ह्या मधला
नवनीतधारी कृष्ण

प्रेमरसाने ओथंबलेला
रासलिलेतला कृष्ण
भावविभोर,  प्रेममग्न
राधेतलाही कृष्ण

तत्व, निति, कृति, सार,
गीतेतला कृष्ण
यादवांच्या यादवीतील
एकाकी शर कृष्ण

अर्पण, निरपेक्ष, विषधारी
मीरे मधला कृष्ण
जात्यासोबत गात ओवी
जनाईचा विठु कृष्ण

भावभक्तीने पुजणाऱ्याचा
मूर्तीमधला कृष्ण
आत आत, सात कप्यात
तुझ्यामाझ्यातला कृष्ण

तुझ्यामाझ्या तृषेतला
इच्छाधारी कृष्ण
ज्याचा त्याचा प्रत्येकाचा
आपला आपला कृष्ण

Saturday, December 2, 2017

ती राधा होती...



मोरपिसातुनि हळूच आली
मऊ, गार झुळूक जराशी
उधळीत स्वप्ने सात रंगी
राधेची अलवार ओढणी

कुरळ्या कुंतला मधुनि सुटुनि
घुंगुर माळा होऊनि बसली
चाल जराशी घुंगुरवाळी
राधेच्या सुकुमार पाउली

पितांबराचा रंग सोनसळी
उन कवडसे लख्ख चमकति
झरझर झर झर येती खालति
बरस बरसले राधेच्या कांती

मधाळ भाव श्रीहरीच्या वदनी
निल गडद मेघांच्या मधुनि
भोर काळ्या मिटलेल्या डोही
काजळ काळे राधेच्या नयनी

अन मुरली मधून पाझरली ती
नव्हती दुसरी तिसरी कोणी
हळूवार उतरली, तीच होती
ती राधा होती, हरीच्या अधरी...

वाट असावी, वहिवाट नसावी



झुळुझुळू झर वहात असावी
आम्रतरु अन झुळूक जराशी
विहरत विहरत कोकिळ गाई
मनात फुलती अविरत गाणी

कधी पुळण वाटे हवीशी
लाटाची नक्षी हवे सभोती
स्वप्नातली सुंदर हवेली
बांधून पाहिन रेतीवरती

चित्र असे हे पुजते मानसी
सोबत सखेग तूच असशी
गुज  मनीचे सांगत राही
इरावती नव्हे ही अरुंधती

कळ

सुंदर सोनेरी सकाळ
नदीकाठची झुळझुळ
सुटलेले भन्नाट वादळ
वाडीतला उंच पोफळ
धप्पकन पडलेला नारळ
अंगणात झालेली पळापळ

उरात एक कळ
मन मात्र नितळ
शरीरभर मरगळ
मनाची मात्र चंगळ
बांधावच जरा बळ
आणावं सोंग बळं

वाटतं व्हावं फटकळ
मनात उगा हळहळ
डोळा पाणी घळघळ
आसवांना नाही खळ
नात्यांचा सारा घोळ
सोडव ते, चल पळ

गुढ गंभीर संध्याकाळ
दिवेलागण, कातरवेळ
चंद्राभोवती काळं खळं
उनाड लाटांची खळखळ
उजाड पसरलेला माळ
भोवंडून टाकणारा काळ!

ती, ...


गुणगुणते गुज काही खिडकीशी
संवाद मनाशी मनाचा चाले
आश्वस्त अशीही तुला पाहुनि
मज मलाच निवांत वाटे

आठवशी का जुन्यापुराण्या गोष्टी
की पाहशी नवनवीन स्वप्ने
समाधान मुखावर असे की
मज बघुनी निवांत वाटे

आठवती दिवस ते सोनेरी
सत रंगी तुझ्या बालपणीचे
कधी, कशी होशील मोठी
मज सतत चिंता वाटे

आज बघुनी तुला अशीही
घेशी निर्णय योग्य आयुष्याचे
आपुले, सर्वांचे नशीब घडविशी
पाहुन मज सार्थक वाटे

रहा अशीच सखे समाधानी
विलसु दे हास्य असे
नयनी आशा, रहा आनंदी
हेच आशिष द्यावे वाटे

हे पण हवं, तेपण हवं...

हे पण हवं, ते पण हवं
इथे पण गुंतायचय, तिथे पण
हे पण बघायचय, ते पण
सगळंच सगळंच हवय
ह्याचीपण तक्रार आहे, त्याचीपण
अडचणी सारख्या, सगळ्याच्याच
सहानुभूती हवी, सारखीच
सगळ्यांकडून,अन सतत
मी, मी, आणि फक्त मीच
लक्ष द्या, वा वा म्हणा,
आईग म्हणा, बिग हग म्हणा
फक्त मला, मला, मलाच
पण वेळ मात्र देणं नाही,
कशालाच, कोणालाच, कधीच...
पूर्णत्वानं झोकून देणंही
नाही, नाही, नाहीच
बयो, बस झालं,  बस थोडं
थांब थोडं, आत बघ थोडं
श्वास घे थोडा, खोलवर
मोठी हो ग, मोठी हो
कोणी येऊन नाहीच करू शकत
तुला अचानक जादुने मोठं
आपलं आपणच व्हावं लागेल
तुझं तुला मोठं
आहे त्यातूनच शोधावा लागेल
तुझा मार्ग, तुझ्याच साठी
तुझा आनंद, तुझं समाधान
तुझं तुलाच शोधायचय
ह्याच्या, त्याच्या, कुबड्या घेत फक्त
नाही ग येणार वाटचाल चालता
त्या धरायला किमान लागणारेत
तुझेच खांदे, तुझीच ताकद
ओळख हे, लवकरात लवकर
हे सांगणारेही चाललेत पांगत
छाटत चाललीयस आधार
पुढे आहे एकाकी रेत...

पसरलय विस्तीर्ण आयुष्य
ठरव, हवीय आभासी हिरवळ
की खरीखुरी, हिरवीगार, शांत
प्रेमाची, विश्वासाची पाखर!