Wednesday, March 16, 2016

कातळावरची राणी


प्रकाशचित्र:  सौजन्य :  चैतन्य खिरे 

चहूकडे पाणी आणि कातळावर राणी    
भरून आली मनामधे निळी निळी गाणी

काठावरले वृक्ष त्याची जळात साउली
हलती डुलती पाने, तिला त्याच्या चाहुली

रावा उडे इथे तिथे, करावया पाहणी
रंगुनिया प्रेमात ती, विणे घरटे शहाणी

पिल्ले दोन सानुली, जणु घरटे अोंजळी
लुकलुकु डोळे अन, मऊमऊ लव्हाळी

दिन सारा येर झारा, भूक पिलांची कोवळी
मायबाप देती घास, चोच जणु रोवळी

घंटा निनादे, काठावरल्या उंच राउळी
हळुहळु विसाव्यास येई, रात्र निळीकाळी

किनारा

निळ्याशार पाण्याला लगटून    
पहुडलेली गुलबट पांढरी रेती...

रेती, जितकी हातात घट्ट पकडावी
तितकी सरसर निसटून जाणारी
अन लाटा, जितक्या कवेत घ्यावात
तितक्या हुलकावणी देऊन परतणाऱ्या...

कळली, कळली म्हणे पर्यंत
राधे, धारे सारखी फक्त स्पर्शून जाते
अन तो कन्हैय्या तर, स्पर्शून जाताना
पायाखालचा आधारही निसटू निसटू करून जातो

राधा काय, कृष्ण काय
दोघांना सुटं सुटं सापडवणं
काही खरंं नाही, काही सोपं नाही.
पण ते दोघे जेव्हा मिळून जातात
एकमेकांत, होऊन जातात एकरुप,
मग सोपं होतं त्यांना समजणं,
ओली पुळण सहज बसते हातात
अन खाली साचलेलं पाणीही
सहज होतं ओंजळीत घेणं

किनाऱ्यावर पहुडलेले दोघे
गुलबट गोरी राधा,
अन तिला कवेत घेणारा
निळा कृष्ण