Friday, July 31, 2015

फरक


एक एक तुकडा अनुभव
उपभोग, आनंद, सोहळा
अंगातला प्रत्येक धागा
कडक, ताठ, ताठर .
       एक एक तुकडा अनुभव
       उपभोग, भोगणे, सोसणे
       अंगातला प्रत्येक धागा
       मऊ सूत मऊसूत...

एक एक तुकडा अनुभव
देणे, रुजवणे, निर्मिती
अंगातला प्रत्येक धागा
आवर्जु सांगणे, मिरवणे
       एक एक तुकडा अनुभव
        घेणे, रुजवणे, सृजन
       अंगातला प्रत्येक धागा
        हळुवार जोपासणे, जोजवणे...

एक एक तुकडा अनुभव
धावत जाऊन आणणे
अंगातला प्रत्येक धागा
वीण तपासत राहणे.
        एक एक तुकडा अनुभव
       धाव धाऊन वाढवणे
       अंगातला प्रत्येक धागा
       हरएक आसूसून विणणे...

एक एक तुकडा अनुभव
तावून सुलाखून पाहणे
अंगातला प्रत्येक धागा
स्वच्छ स्पष्ट रेखणे.
        एक एक तुकडा अनुभव
       सोसून सोसून, जोपासून
       अंगातला प्रत्येक धागा
       त्यातच मुरववून टाकणे...

एक एक तुकडा अनुभव
आकंठ मिरवून घेणे
अंगातला प्रत्येक धागा
एकसलग गरम घोंगडी.
        एक एक तुकडा अनुभव
        आकंठ जगून घेणे
        अंगातला प्रत्येक धागा
        एकजीव, उबदार गोधडी !

No comments:

Post a Comment