Friday, January 16, 2015

कोठार


ये, ये, टेक डोके खांदयावर
टीप तुझे डोळे, मऊशार पदराने
सांग तुझी सारी, सारी कहाणी
बोलून टाक, मनातले सारे काही
हलके करून टाक, सारे बोचणारे
थोपटून घे थोडे प्रेमाने, हक्काने.

सारी सारी पानगळ, सोसेल ही धरणी
तुला हवा तो, सारा ओलावाही देईल
जगण्यासाठी, नवी उभारीही देईल
नव्या आशांचा, मृदगंधही देईल
तुझ्या सुखांचा, अविरत आशीर्वादही
अन, "मी आहे“, हा आश्वासक खांदाही.

फक्त एक करशील,
कधीतरी मागे वळून,
डोळाभर पाहशील?
उमललेली कोवळी पाने,
हळुच मला दाखवशील?
फुलणारी कळी,
आसुसून दाखवशील?
झळाळणा-या आनंदाचे
दोन किरण, परावर्तीत करशील?

कसय ना,
अडी अडचणीला, उपसावं लागतच कोठार;
पण नेहमी नेहमी, फक्त उपसायचं नसत;
कधीतरी, आपणच, भरायचही असतं;
है ना  ?