Wednesday, May 7, 2014

आरसे


प्रेम म्हणजे नक्की काय असतं
न भांडता, प्रेमळपणे
एकाने दुस-याची मूळ मते, स्वभाव
बदलून टाकणे
की
वेळप्रसंगी भांडून तंडून
दुस-याला त्याच्या मता-स्वभावा प्रमाणे
वागू देणं

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
प्रेमळपणे आपल्याला हवे तेच
दुस-याला देणे
कि
वाद घालूनही, शेवटी
दुस-याच्या गरजा अन अपेक्षांनुसार
त्याला हवे ते देणे

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
प्रेमळपणे दुस-यावर हक्क दाखवत
आपली हुकमत गाजवणे
कि
वेळप्रसंगी पुढे ढकलून
दुस-याला त्याची वाट
चालायला लावणे

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
प्रेमळपणे एकमेकांचे पाय
एकमेकांत गुंतवून ठेवणे
कि
समजून उमजून, स्वेच्छेने
दोन वेगळ्या वाटा
सोबतीने चालणे

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
लोकांना दाखवण्याचे
सुखी संसाराचे
शो पीस असावेत
कि

एकमेकांना दिसणारे
सुखी जीवनाचे
असावेत आरसे