Wednesday, May 7, 2014

आरसे


प्रेम म्हणजे नक्की काय असतं
न भांडता, प्रेमळपणे
एकाने दुस-याची मूळ मते, स्वभाव
बदलून टाकणे
की
वेळप्रसंगी भांडून तंडून
दुस-याला त्याच्या मता-स्वभावा प्रमाणे
वागू देणं

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
प्रेमळपणे आपल्याला हवे तेच
दुस-याला देणे
कि
वाद घालूनही, शेवटी
दुस-याच्या गरजा अन अपेक्षांनुसार
त्याला हवे ते देणे

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
प्रेमळपणे दुस-यावर हक्क दाखवत
आपली हुकमत गाजवणे
कि
वेळप्रसंगी पुढे ढकलून
दुस-याला त्याची वाट
चालायला लावणे

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
प्रेमळपणे एकमेकांचे पाय
एकमेकांत गुंतवून ठेवणे
कि
समजून उमजून, स्वेच्छेने
दोन वेगळ्या वाटा
सोबतीने चालणे

प्रेम म्हणजे नक्की काय असतं
लोकांना दाखवण्याचे
सुखी संसाराचे
शो पीस असावेत
कि

एकमेकांना दिसणारे
सुखी जीवनाचे
असावेत आरसे
Wednesday, March 26, 2014

अगदी तेव्हाच

संपले पुस्तक होते राहिले, शेवटचे एक पान
पडाव होता दूर थोडाच, तुला त्याची आस

झिजलेल्या काळ्या धाग्याची, गळ्यामधे गुंफण
झाली होती भाळावरली, चिरी फिकी पण

पायाखाली रिती थोडी, अजून होती वाट
पायामधे शिल्लक होते, अजून थोडे त्राण

फांदीवर तगून राहिलेली, पिवळी एक शेंग
आलाच होता पडायला, अळूवरचा थेंब

चोचीमधे होता उरला, फक्त शेवटचाच घास
होतच आली होती पूर्ण, फिनिक्स पक्षाची राख

गळ्यात होते थरथरते, सुंदर एक गान
शेवटचीच होती मैफलीत, भैरवीची तान

शेवटचा अजून चालूच होता, एक श्वास - नि:श्वास
चेह-यावरचा मुखवटा उतरला, अगदी अगदी तेव्हाच

Tuesday, March 25, 2014

आठोळी (?)


जिवावर उदार होऊन
वार्‍यावर स्वार होऊन
दिपवणार्‍या एका क्षणासाठी
आकांत लाटेवरच्या थेंबाचा !

त्याचेच नाते सांगताना
माझी मात्र घोषणा
"आयजीच्या घामावर
चमकण्याची... !"

३०.११.१९८६

Wednesday, February 19, 2014

गोधडी

फिरले मि दाही दिशा
रुजवली नाती नवी
जोड जोडले आप्त काही
पण भेटले ना मलाच मी

आत शोधते आज काही
रुजवते आज नवीन बी
खुणावते दिशा नवी
आशेस येई पालवी

मनातली धूळ जुनी
पुसूनी केली पाटी नवी
झाल्या गेल्या काळाची
शिवून टाकली गोधडी

टोचणा-या कित्येक गोष्टी
गुंफल्या एका मेकीतुनी
उरे न आता बोच कुठली
भोग सारे भोगुनी

गोधडी माझी सखी
उब देई, देई उभारी
संगती माझ्याच मी
शोधेन, भेटेन, मलाच मी