Wednesday, July 31, 2013

ये, सखये ये ....

तसे केव्हाच तुला बुडवले
डोहात, खोल खोल आत
तुझे गुदमरणे, तुझे हुंदके
अगदी गिळून टाकले कधीचे

जिवंतपणाचे लक्षणी बुडबुडे
वर येऊन फुटू नयेत म्हणून
त्या तळ्यावरच सा-या,
बांधून टाकली मोठी कबर;

सणसणीत व्यवहाराची, दिखाऊ, सुबक
त्यावरल रचले कित्येक साज, फुले
पण जाणीवपूर्वक,  शोभेचे.
फुलण्याचा शाप नको म्हणून

हुश्श्य...
मोठा श्वास घेतला, 
चला आता काळजी मिटली
एक मोठा उसासा टाकला,

अन झाले,
तू तशीच
पुन्हा वर,
जिवंत...

तशीच जलजळीत सत्य घेऊन,
भळभळणा-या वेदना घेऊन,
टोचणा-या संवेदना घेऊन.
अन सोबत,
माझ्या जिवंतपणाचा दाखलाही घेऊन

ये, सखये ये ....