Monday, August 15, 1988

सनातन शोध

तुझा मुखवटा आणि तुझा चेहरा
यांच्या मध्ये,
माझा चेहरा येऊ लागला...
तेव्हा -
तुझी मुखवटा ओढायची तीव्रता,
तो टाळण्याची माझी शिकस्त !
तुझ्या चेहर्‍याने , ती मानली
तर तो समन्वय ठरेल;
पण तुझ्या हातात
मुखवटाच आला -
तर तो पराभव ठरेल...
तुझा, माझा, चेहर्‍यांचाही.
तुझा चेहरा आणि मुखवटा
कधी एकच असतीलही,
पण तरीही
मुखवट्याची
तुला वाटलेली गरज -
एकवेळ तीही चालेल मला;
पण तू आणि तुझा मुखवटा
यांमध्ये दुरावा दिसला
तर मात्र
मी डोकावणारच मध्ये.
तुझी पावलं
ओढली जात असतील
मुखवट्याकडे...
माझा हट्टही
मोडावा वाटेल तुला...
पण खरं सांग
तुझा चेहरा -
माझ्या डोळ्यात दिसणारा,
भावतोय तुला ?
की मुखवट्याचीच भुरळ
पडलीय तुला ?
सांग ना,
तुझ्या मुखवट्याचा
तुझा तुलाही
सुटत नाहीये लोभ ?
की तुझ्या चेहर्‍याची -
तुझी तुलाच
पटत नाहीये ओळख ?
लवकर विचार कर;
तुझ्या
चेहरा - मुखवटा
यांच्या सांध्यात
मी, फार वेळ नाही अडकणार.
तुझ्या डोळ्यातल्या
माझ्या
उलट - सुलट प्रतिबिंबात
तुझे आभासी - खरे
रुप ओळखायला
मला,
फार वेळ नाही लागणार.
माझ्या डोहात डोकावताना,
ते फक्त स्वीकारणं - पचवणं
तुला -
तुझ्या मुखवट्याला
कितपत पेलणार आहे ?
काळाच्या ओघात
भावभावनांच्या गराड्यात
तुझ्या बदलत्या चेहर्‍याला
तुझा मुखवटा
कितपत देईल साथ ?
भेगाळणारा मुखवटा
कितपत देणारे संरक्षण ?
आणि तेही कोणापासून ...
माझ्यापासून ?
अन चेहर्‍यांपासून ?
तुझ्याच डोहात डोकावताना
तुझ्याच मुखवट्याचे
अतिक्रमण तुझ्यावरचे,
साहवेल तुला ?
उभा तरी राहू शकशील ,
तुझ्या चेहर्‍यासमोर -
तू ?
चेहर्‍यावरच्या मुखवट्याची ताकद,
त्याचे चेहर्‍यापासूनचे अंतर,
अन साम्य...
तपास. अन
ताडून पहा,
तुझ्या चेहर्‍याला तुझा मुखवटा;
पुन्हा एकदा.
आणि विचार कर
तुला हवाय तो कोण ?
तू की मुखवटा ?
मुखवटा की तू ?

No comments:

Post a Comment