Tuesday, October 19, 2010

मैत्री कशी असावी ....

माझ्या सर्व मित्रमैत्रिणीना

मैत्री कशी असावी ....
पोळीहूनही लुसलुशीत ; जिभेला गोंजारणारी
दुधाहूनही स्निग्ध ; जिभेला मऊसूत करणारी
दह्याहूनही कवडी ; जिभेवर टिकून राहणारी
तुपाहूनही रवाळ ; जिभेवर रेंगाळत राहणारी
श्रीखंडाहूनही निघोट ; जिभेवर मुरत जाणारी
चिवड्याहूनही कुरकुरीत ; जिभेला सोकवायला लावणारी
चकलीहूनही खुसखुशीत ; जिभेला अतृप्त करणारी
पिठीसाखरेहूनही गोड ; जिभेवर विरघळत जाणारी
अन मधाहूनही घट्ट ; जिभभर पसरत जाणारी
मैत्री अशी हवी !

मैत्री कशी हवी ....
मोरासारखी नाचणारी ; निखळ आनंद देणारी
कोकीळेच्या स्वरात गाणारी ; सुखसंवाद करणारी
प्राजक्तासम नाजूक ; हळूवार सुगंधी पखरण
रातराणीसम गंधीत ; मस्त धुंद करणारी
प्रवाहासम वाहती ; हवी तिथे नेणारी
खडकाहूनी अचल ; खंबीर आधार देणारी
मेणाहूनी मऊ ; हवी तशी दबणारी
सोन्यासारखी झळाळणारी ; मैत्रीचा कस दाखवणारी
अन आरशासम पारदर्शी ; जणू तुमचीच प्रतिकृती
मैत्री अशी असावी !

मैत्री कशी असावी...
ढगांसारखी आपल्याच मस्तीत ; हवे तेथे भटकणारी
विजेसारखी लखलखून ; चकीत करून सोडणारी
पावसासारखी भिजवणारी ; प्रेमात चिंब करणारी
न दुभंगणार्‍या पाण्यासारखी ; सलग, सजग, निखळ वाहती
वार्‍यासारखी स्वच्छंद ; बंध मुक्त करणारी
उन्हासारखी चमचमणारी ; लख्ख लख्ख उजळवणारी
इंद्रधनुसारखी सप्तरंगी ; जीवनाला रंगवून जाणारी
सावलीसारखी शीतल ; जणू मायेची पाखर
धरतीसारखी सृजन ; एक एक बी फुलवणारी
मैत्री अशी असावी !

No comments:

Post a Comment