Wednesday, June 16, 2010

राणी सोड आता हात

सोड आता हात छकुले, राणी सोड आता हात
कधी बरं मी हे म्हटलं तुला प्रथम ?
नऊ महिने, नऊ दिवस झाल्यावरही
जेव्हा तू येईनास, तेव्हा म्हटलं होतं
सोड आता हात, ये ना जगात.....
अन मग अगदी आजपर्यंत
कितीतरी वेळा समजावलं मी तुला
राणी, सोड आता हात....
इवलीशी होतीस, अन कामावर जाताना
आपले इवले इवले बळ एकवटून
आपल्या इवल्युश्या बोटांनी
घट्ट पकडायचीस माझं बोट कसंतरी
तेव्हाही म्हटलं तुला
सोनुल्या, सोड आता हात...
शाळेत तुला सोडताना
तुझा हिरमुसलेला, गोंधळलेला चेहरा पाहून
तुटलं माझ्या मनात, पण तरीही म्हटलं होतं
राणी, सोड आता हात...
सायकल शिकायला लागलीस
पण मी दिलेला आधार तू सोडायची नाहीस
अगदी तेव्हाही मी म्हटलं
आता सोड हात...
कळीचे फूल झालं,
सोबत मैत्रिणींचे झेले आले,
तरीही प्रत्येक गोष्ट, माझ्या मागे मागे फिरत
पदर धरून आलीस सांगत
तेव्हाही हसून म्हटलं
राणी सोड आता हात...
आता राणीला राजा, होतो आम्ही शोधत
तेव्हा तू म्हणालीस, थोडं थांबा;
चार धामची यात्रा होती आमच्या मनात;
म्हणालीस, ती पूर्ण करते,
मग धरते, राजाचा हात....
चार धाम यात्रेत पावलोपावली आता
आम्हीच धरला तुझा हात
उंच चढण, दगडी वाट, निसरडी वाट,
डावीकडे कडा, उजवीकडे खोल खोल दरी...
अन,
काय घडले, काहीच कळले नाही
हे काय झाले विपरित...
मला दरीपासून वाचवत
उभी होतीस सावरत
पायाखालचा दगड
निसटला एका क्षणात
मी करेपर्यंत पुढे हात
तू खाली दरीत
नजरेसमोर, एका क्षणात
तू खोल खोल खाली...
अन मग एका झाडीत
दिसलीस तू अडकलेली
देवाचे आभार मानत
हाका मारत, राहिले सांगत,
"राणी, नको सोडू हात...
घट्ट धर, आम्ही शोधतोय मदत."
किती धावाधाव, कित्येकांचे हात
दोर्‍या, शिड्या, सूचना,
किती किती जणांची मेहनत...
दुपार झाली, झाली सांजवात
तू तिथेच खोल खोल दरीत
आम्ही फव-त सांगत
"राणी घट्ट धर, सोडू नको हात"
आजुबाजुचे चेहरे आता चालले बदलत...
वाटाड्यांतले अनुभवी म्हातारबा
आता झाले पुढे, अगदी मऊ आवाजात
हळू हळू थोपटत..
मला बाजूला घेत
म्हणाले, " माई आता बास "
"अहो असं काय करता
तिनं धरलाय हात घट्ट
मला आहे माहीत
ताकद आहे तिच्यात
धरेल ती रात्रभर हात
आपण सकाळी करुया मदत"
"माई, ऐकून घे
रात्र आपली नसते कधीच
अन त्या आधीच ही
वर घोंगावणारी गिधाडं बघ.
त्यांना नसते दयामाया
त्यांना असते फव-त
आग पोटात.
त्यांना नसतो विधीनिवेश
कळते त्यांना फ्व-त वेळ.
नसतोच त्यांच्या कायद्यात
हा नियम- जिवंत की मृत.
आता लेकीला सांग, सोड हात...
जिवंतपणी मरण्यापेक्षा
सुखाचे मरण पत्कर....
माई, सांग तिला, सोड आता हात ..."
" अहो असं कसं सांगू
माझ्या काळजाचा तुकडा...
आयुष्यभर रहा लढत
आले मी तिला सांगत.
तिला सांगू आता
सोड मैदान आता ?
एका आईला हे सांगता...?"
" माई, माझे ऐक.
गिधाडांना, आधी दिसतात डोळे
मग......, हे सगळं नाही साहत
म्हणून म्हणतोय सांग तिला, सोड हात.... "
एक भयाण वास्तव
उभे माझ्या समोर
अन मग ओरडत
धावले मी दरीत
सगळ्यांनी आवरत
पकडून ठेवत
आगे नेलं ओढत....
मी मात्र ओरडत.....
"राणी, सोड आता हात.....
राणी, सोड आता हात.....
राणी सोड आता हात..............."
-----------------------------------------------------------------------------------------
खरी घडलेली घटना. माझ्या मैत्रिणीने पाहिलेली. ऐकल्यावर मीही सैरभैर झाले. आज ती अशी उअतरली माझ्या मनात. आता लिहितानाही खुपदा वाटले नाही लिहू इथे. पण त्या आईचे दु:ख मला स्वस्थही बसू देईना. आता लिहितानाही डोळ्यातले पाणी थांबत नाही.........
मला खरच वाटत नव्हतं इथे ही कविता टाकावी. पण मला वाटलं हिच माझ्याकडून एक श्रद्धांजली असेल तिला.

No comments:

Post a Comment