Sunday, January 22, 2012

गाणे ...

तंबोरा कानाला लावून ऐकत रहावा
गुंजत राहणारा षडज ...
आयुष्याला छातीशी लावून
तशीच ऐकत राहिले
जगण्याचा हृदयंकार

तंबोरा लावताना पिळावी तशी
प्रत्येक खुंटी
पिळत राहिले सगळ्या भावभावना
अन जगण्याचा सूर कधी
नाहीच होऊ दिला बेसूर

वर वर पाहता छेडत होते
फक्त प सा सा सा
पण त्यातच होते
सारे, अगदी सारे सूर
आयुष्याच्याच गाण्याचे ... !

No comments:

Post a Comment