Wednesday, November 14, 2012

ऋतुचक्र

उन्हाच्या झळा, आता तीव्र होऊ लागतात
कोकिळाला आपला सूर, बरोब्बर सापडू लागतो
आसमंतात आंब्याचा गंध, दरवळू लागतो
वाळक्या सुक्या फांद्यात, हिरवा रंग घुमू लागतो
अन रानातल्या झाडांमधून, "वसंत" पिंगा घालू लागतो

आभाळात काळे-निळे ढग, डोकावू लागतात
मधूनच वा-याच्या अंगात, वादळ घुमू लागते
भूमीची तृषा अजूनच, भेगाळत वाढत जाते
कोकिळाची लकेर, आता अधिकच तीव्र होऊ लागते
अन त्या तिथे, नैऋत्येकडून "ग्रीष्मा"ची चाहूल येऊ लागते

आता फुटतो, आवाज पेर्ते व्हा ला
शेता शेतात, लगबग वाढीस लागते
झाडांच्या निष्पर्ण टोकांना, उभारी येऊ लागते
अन आकाशातून जीवन, अक्षरशः कोसळू लागते
सा-या सृष्टीला नाहू घालण्यासाठी, "वर्षा"राणी धाऊन येते

लेकूरवाळ्या फांद्या, डोईवर हिरवा पदर घेऊ लागतात
गोजि-या रंगबिरंगी फुलांची, परडी सजू लागते
दाट धुक्याची ओढणी ,धरती अलगद ओढून घेते
नदी धीर गंभीरपणे, संथ-शांत वाहू लागते
"शरदा"च्या शीतल चांदण्यात, मुलायम स्वप्न फुलत जाते

गारवा हळुहळु, सारीकडे पसरू लागतो
दिवसाचा प्रहर, छोटा-छोटा होत जातो
सूर्यनारायणाचे तेज, विझू-विझू होऊन जाते
सारी सॄष्टी, चिडिचूप होऊन जाते
अन "हेमंता"ची थंडीची दुलई, सारी सृष्टीच पांघरून घेते

थंडीचा कडाका, हळुहळू वाढत जातो
आता नाहीच सहन होत, झाडांना पाने
पिवळ्या पानांचे जडशीळ शालू, उतरवले जातात
भल्या थोरल्या रात्री, आता नकोशा होऊ लागतात
अंगावर शिरशिरी उमटवत, "शिशीर" आपले ठसे उमटवत जातो

अन मग पुन्हा, नवा कोकिळ, आपला सूर शोधतो
अन एका नव्याच वसंताची चाहूल, सा-या सृष्टीला लागते
जुन्याचा मागोवा संपवून, नव्याचा शोधात ती गुंगून जाते
ऋतू मागुनी ऋतू, असे बदलते-असे गरजते-असे बरसते
युगायुगांच्या सुपीक कुशीत, "ऋतुचक्र" हे असे फिरते

Thursday, August 30, 2012

खेळ मांडला ...

मानवी भाव-भावनांचा, खेळ मांडला मी
शतकी चलचित्रपटांची, गाथा मांडली मी

"राजा हरिश्चंद्रा"ची, पहिली वहिली कथा.....................(पहिला चलचित्रपट, १९१३)
गाऊ, बोलू लागली, ही "आलम आरा".........................( पहिला बोलपट, १९३१)
भारतीय चित्रपट पहिला, "आयोध्येचा राजा"................( पहिला पूर्ण लांबीचा भारतीय चित्रपट, पहिला मराठी चित्रपट, १९३२)
आली रंगूनी "सैरंध्री", शोभली सप्तरंगा.................... ..(पहिला रंगीत चित्रपट, जर्मनीत प्रोसेस केलेला,१९३३)
मिळू लागला न्याय, "अछुत कन्या" ला..................... (सामाजिक प्रश्नावरील चित्रपट, १९३६)
रंगविला भारतीय रंगात, "कृष्ण कन्हैया" ला.............. (भारतात प्रोसेस केलेला पहिला रंगीत चित्रपट, १९३७)

भयभीत झालो, पाहुनिया "अनारबाला" ........................ ( पहिला भयपट, १९४०)
"तातार का चोर' दिसे, अद्-भूत बरा............................ ( पहिला अद्-भूतरम्य चित्रपट, १९४०)
शास्त्रीय चमत्कार हा, "जादुई बंधन" ......................... . (पहिली सायन्स फिक्शन, १९४१)
"उम्मीद" ने भरली, विनोदाची कावड............................ ( पहिला विनोदी चित्रपट, १९४१)
गोष्ट सा-या कुटुंबाची, झाले "खानदान"........................ ( १९४२)
प्रेमिजनांची गुजगीते, गायी "तकदिर"............................ (१९४३)

''किस्मत''ने दिला, युद्धाचा दुहेरी चेहरा............................. (१९४३)
होई सा-या देशभर "एलान", स्वातंत्र्याचा........................... (१९४७)
देशासाठी कित्येक झाले, वीर "शहिद".............................. (१९४८)
"आनंदमठ" देई मंत्र, वंदे मातरम..................................... (१९५१)
देश भक्ती गीते गाती "हम हिंदुस्तानी"............. ............. (१९६०)
सैनिकांची "हकिकत" पोहचे गीतागीतातूनी........................ (१९६४)

गाण्यां सवे भिजुनी गेलो, "बरसात" मधे........................... (१९४९)
गानकोकिळा गुंजत राही, गूढ "महल" मधे........................ (१९५१)
"बैजु बावरा" च्या संगीतात, सारे सारे विसरे..................... (१९५२)
"नागीन" च्या डौलदार, नाचात मन रमे........................... (१९५२)
"चलती का नाम गाडी" तून, मस्त मी फिरे....... ............. (१९५८)
"अनारकली" च्या श्वासाबरोबर, श्वास माझा अडे... ......... (१९५३)

"दो बिघा जमिन" दे म्हणूनी, आयुष्य सारे सूने.............. (१९५३)
मांडला आयुष्याचा जुगार, या "फूटपाथ'' वर................... (१९५३)
''दो ऑंखे बारह हाथ'' उगारले दुखा:वर.......................... (१९५७)
''मदर इंडिया'' सवे, ओढला नांगर शेतात........................ (१९५७)
''काबुलीवाला'' सवे भोग, भोगले परदेशात...................... (१९६१)
रचविली दुखा: वर दुखे, ''देवदास'' च्या सवे........ ............ (१९५५)

हळुवार स्पर्षूनी ''सुजाता'', मोडिली बंधने....................... (१९५९)
''जंगली'' याहू तुनी वाहती, मुग्ध प्रेमासे झरे.................. (१९६१)
''मुगल ए आझम'' चा तराजू, तोल सांभाळे....... ............ (१९६०)
''बीस साल बाद'' पुन्हा, येत राहती आठवणी.................. (१९६२)
दिव्य त्या चल-चित्रांसाठी, ही माझी ''आरती''................. (१९६२)

Saturday, July 21, 2012

.... चांदणे माझ्या मनी |

(परवा मा. राजेंद्र कंदलगावकर गुरुजींच्या शिष्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करताना सुचलेले काही ....)


वेगळ्या रंगात असुनि, रंगते त्यांच्या सवे
रचलेली माळ त्यांची, शब्द-सूतात ओवते |

पौर्णिमा त्यांच्या गुरुंची, सुस्वरांनी साजरी
सूर त्यांचे लीन सारे, भावपूर्ण स्वरांजली |

ओवला मोती हरेक, वाहिला श्री गुरुचरणी
साधकांच्या संगीतांचे, सूर कानी दरवळती

वेधता शब्दात सूरांना, शब्द ही झाले सुरिले
ओवलेल्या फुलांनी, सूत माझे गंधावले |

सूत-शब्द फक्त माझे, सूर्-मैफिल ही तयांची
पौर्णिमा त्यांच्या गुरुंची, चांदणे माझ्या मनी |

Tuesday, May 29, 2012

साथ

दु:ख, सुख, अपुरेपणा
सा-या सा-या आवरलेल्या वेदना
तू येताच मात्र, अश्रूंनी मुक्त व्हावं
असं का व्हावं, तुझ्या सहवासात

बंदिस्त वणव्यात, न फुटणारा
भाऊक गर्दीतही, न पाझरणारा
तुझ्या संरक्षक आपुलकीत मात्र
धडाधड कोसळतो, असा कसा हा बांध

रक्ताची ओढ, नात्याचा बंध
मैत्रीचा धागा, या सर्वांहूनही
तुझे केवळ अस्तित्वही
व्हावे केव्हढे आश्वासक

तुझ्याशिवाय मी, माझ्याशिवाय तू
दोघेही असूच. पण त्याही पेक्षा
एकमेकांसाठी, एकमेकांसह असणं
किती आनंददायी आणि परिपूर्णही !

Friday, March 30, 2012

तू गेलास तेव्हा ...

वैशाखाआधीच
असा वणवा पेटला !

अनेकदा कळला,
अनेकदा नाही
पण भिडत राहिलास
प्रत्येक वेळेस,
आत अगदी आत
कोठेतरी...

'हृदया'च्या संगीतातून
पाझरला जेव्हा जेव्हा
शब्द शब्द तुझा;
आत आत
झरत राहिला
पाऊस,पाऊस नुसता...

माझ्याही मनातल्या,
मलाच न समजलेल्या
भावभावना
वाचत राहिले
कधी समजून
कधी न उमजून...

आता तर तूही गेलास,
आता येणारा वैशाख
कसा, कसा झेलू ?
अन आता तो पाऊसही
'निनादेल' की नाही
कोण जाणे ...

Saturday, March 3, 2012

स्वर्गलोकीची परी

जिथे फुलली रातराणी
धुंदावत तेथे जाई

जाईजुईचा वेल ही
अशी झुलते कमानी
फुले कुंद ठाई ठाई
झाड शुभ्र चांदण्यांनी

झुबे बुचाचे डोलती
वार्‍यासंगे वरखाली
नवे धुमारे फुटती
सुगंधी मधुमालती

टपोरी गुलाब कळी
शोभे बागेची राणी
छे स्वर्गलोकीची परी
येई माझिया अंगणी

Sunday, January 22, 2012

गाणे ...

तंबोरा कानाला लावून ऐकत रहावा
गुंजत राहणारा षडज ...
आयुष्याला छातीशी लावून
तशीच ऐकत राहिले
जगण्याचा हृदयंकार

तंबोरा लावताना पिळावी तशी
प्रत्येक खुंटी
पिळत राहिले सगळ्या भावभावना
अन जगण्याचा सूर कधी
नाहीच होऊ दिला बेसूर

वर वर पाहता छेडत होते
फक्त प सा सा सा
पण त्यातच होते
सारे, अगदी सारे सूर
आयुष्याच्याच गाण्याचे ... !