Monday, November 14, 2011

मनातले काही बाही....

मनातले काही बाही
आले आले ओठावरी
मनातले काही बाही
वाहे ओळी ओळीतूनी

सुख-दु:ख तुझे माझे
शब्द-सूर फक्त माझे
थोडे तुझे थोडे माझे
थोडे हिचे थोडे तिचे
गूज आपुल्या मनीचे
सांडे ओळी ओळीतूनी

मागे मागे जाई झोका
लपाछपी, काचापाणी
सागरगोटा, लगोरी
खापर्‍या नि सापशिडी
बालपणीचा हिंदोळा
झूले ओळी ओळीतूनी

तीन पेडीची ती वेणी
रंगलेली लाल मेंदी
छुमछुम पैंजणे ती
चुल-बोळकी उलुशी
रंगलेली भातुकली
दिसे ओळी ओळीतूनी

राजकुमार मनीचा
धावे अबलखी घोडा
वाटे भरुनी घालावा
हाती हिरवा तो चूडा
सडा गुलाबी स्वप्नांचा
सांडे ओळी ओळीतूनी

मनाजोगता सौंगडी
दिला हात त्याच्या हाती
स्वप्नं दाटली नयनी
आता करायची पुरी
किती रमले संसारी
सांगे ओळी ओळीतूनी

सहजच ओलांडले
ओटी-पोटीचे मी धागे
सांभाळुनी ओलांडले
भरले माप सासरचे
माहेरचा धागा लपे
काळ्या ओळी ओळीतूनी

किती सहज चालले
सार्‍या नात्यांच्या या वाटा
किती सहज रंगले
रंगामध्ये मी या सार्‍या
सुखी संसाराचे गाणे
गाई ओळी ओळीतूनी

Wednesday, November 9, 2011

मी एक स्वतंत्र वर्तुळ

ऊल्हास भिडे यांच्या "π (२२/७)"" :http://www.maayboli.com/node/22901
या कवितेकडून प्रेरित होऊनमाझ्या भावनांचे
अर्थ उलगडत, संदर्भ देत
भावभावनांच्या गुंत्यात
राहिले मी गुंतत
मी आखलेल्या पण
तू दुर्लक्षिलेल्या
व्यापलेल्या परिघाच्या
वर्तुळाच्या केंद्री....
मी .....
……………………
हळूहळू हळूहळू
माझा परिघ
आकसत गेला
मग एक नवेच
फक्त माझे असे
स्वतःचे व्यक्तित्व असलेले
"माझे" वर्तुळ
सापडले मला
तू मात्र पूर्वीच्यात
पारंपारिकतेत मश्गुल
माझ्या वर्तुळाच्याही परीघा बाहेर
माझ्यापासून कितीतरी दूर.....