Friday, February 18, 2011

चैतन्य !

चैतन्य माझा पहिला भाचा ! पुढच्या महिन्यात त्याचे लग्न... त्याच्या बालपणीच्या या काही गोड आठवणी...अजूनही मला लख्ख आहे आठवण
तो दिवस... आणि तो क्षण...

सुरू झाली होती ऑक्टोबर हिट
अन दुपारच्या भर उन्हात, गरम होती गाडीची सीट
धावतच चढले जिना तो उभट,
नर्सने दाखवले एका दिशेला बोट
खोलीत मी त्या घुसले थेट,
आत होता अंधार दाट

अन क्षणात दिसलास मला तू .....
पडद्याच्या झिरपणार्‍या मंद प्रकाशात, जाळी आड झोपलेला तू
गुलाबी कापसाची नुकतीच उमलेली कळी जणू तू
सुदृढ,सतेज,सुकुमार,गुलाबी गोरा,गब्दुल, गोंडुस तू
आमच्या घरातले पहिले बाळ तू
आमच्या घरी आलेला चैतन्य तू.......

अन मग घरी तू आलास.
आतापर्यंत न आवडणारा, धूपाचा वास
तुझ्या सान्निध्यात,मात्र झाला सुवास

आठवतात तुझे चमकणारे डोळे
तळपाय तुझे गुलाबी,गोबरे ;
सतत चुळबुळणारे हातपाय तुझे
अन हो, अगदी तुझे ओकरे बाळसे....

कधी आईचे केस हातात धरून झोपणारा तू
कधी बाबांच्या स्कूटरवर पुढे उभा राहणारा तू
कधी 'आबा काय करता' म्हणत त्यांच्यामागे फिरणारा तू
कधी आजीची लांब वेणी धरून तिच्या मागे लुटुलुटु फिरणारा तू
कधी मावशीबरोबर ऑफिसला जाण्याची स्टाईल मारणारा तू
कधी माझ्या केसांना गालावर घासण्यासाठी पाठीमागून गळ्यात पडणारा तू

तुझ्यासाठी तयार झालेली माझी, पिटीक पिटीक माकडाची गोष्ट
अन तुझ्या सोबतीने म्हटलेली कित्ती कित्ती बडबडगीतं
खेळलेले खेळ अन केलेली बाष्कळ बडबड
अन आठवतं
हे सगळे करताना पुरेपुर उसळणारे तुझं
चैतन्य........

मग आठवतोस तू ,
मी पहिली शिवलेली वीतभर उंचीची फुलपँट;
अन तळहाताएवढा फुलशर्ट घालून टकामका पाहणारा तू
मग छोट्या अमेय बाळा कडे कुतुहलाने बघणारा तू
नंतर राहूल बाळाला मांडीत घट्ट पकडून बसलेला तू
मधुराचा झालेला जबाबदार दादा तू
अन चुळबुळ्या, चिडक्या , रागीट निखिलला कडेवर घेणारा तू......

कधी आठवतोस राहूल बरोबर, चिक्कू-आंब्याच्या झाडांवरून उड्या मारणारा तू.
तर कधी आठवतोस, लांबलचक फुलांची माळ घेऊन हॉलभर लुटुलुटू पळणारा तू.
कधी आठवतोस काळ्या सिल्कच्या मधला, तर कधी लालभडक गंजीतला तू.
कधी आठवतोस हिरव्या झब्ब्यातला, "शिष्ठ" पणा दाखवणारा भलताच गोंडूस तू.
तर कधी पायर्‍यांवर, थंडीतल्या उन्हात, आमच्याबरोबर शेकत बसलेला तू.

कधी आठवतोस तू, झालेला बनी रॅबिट
खरा रॅबिटही कधी दिसला नाही; तुझ्याइतका क्यूट.
कधी आठवतोस शाळेतल्या ड्रेसमधला तू,
तर कधी गॅदरिंगमधल्या नाचातला तू.
कधी आठवतोस कापलेल्या केसांची वेणी रागावून फेकून देणारा तू
अन कधी चिकनची तंगडी मन लावून खाणारा तू.

अन मग गेलास वर्षभर त्या लांब लांब देशात तू.
फोनवरून 'हॅलो माई' म्हणणारा तू
अन तीन मिनीटात फोनमधून भेटायचा प्रयत्न करणारे आम्ही.
आईच्या खुप मोठ्या पत्रांतून अन त्यातून येणार्‍या फोटोंतून
पाहिले आम्ही वाढताना तू

अन मग तू आलास; दिसलास एअरपोर्टवरती
धावत येऊन, उडी मारून; घट्ट मारलीस मिठी
आजही आठवते, डोळ्यात आणते पाणी
पाच मिनिटं ती तुझी , माझ्या जन्माची सोबती