Monday, November 14, 2011

मनातले काही बाही....

मनातले काही बाही
आले आले ओठावरी
मनातले काही बाही
वाहे ओळी ओळीतूनी

सुख-दु:ख तुझे माझे
शब्द-सूर फक्त माझे
थोडे तुझे थोडे माझे
थोडे हिचे थोडे तिचे
गूज आपुल्या मनीचे
सांडे ओळी ओळीतूनी

मागे मागे जाई झोका
लपाछपी, काचापाणी
सागरगोटा, लगोरी
खापर्‍या नि सापशिडी
बालपणीचा हिंदोळा
झूले ओळी ओळीतूनी

तीन पेडीची ती वेणी
रंगलेली लाल मेंदी
छुमछुम पैंजणे ती
चुल-बोळकी उलुशी
रंगलेली भातुकली
दिसे ओळी ओळीतूनी

राजकुमार मनीचा
धावे अबलखी घोडा
वाटे भरुनी घालावा
हाती हिरवा तो चूडा
सडा गुलाबी स्वप्नांचा
सांडे ओळी ओळीतूनी

मनाजोगता सौंगडी
दिला हात त्याच्या हाती
स्वप्नं दाटली नयनी
आता करायची पुरी
किती रमले संसारी
सांगे ओळी ओळीतूनी

सहजच ओलांडले
ओटी-पोटीचे मी धागे
सांभाळुनी ओलांडले
भरले माप सासरचे
माहेरचा धागा लपे
काळ्या ओळी ओळीतूनी

किती सहज चालले
सार्‍या नात्यांच्या या वाटा
किती सहज रंगले
रंगामध्ये मी या सार्‍या
सुखी संसाराचे गाणे
गाई ओळी ओळीतूनी

Wednesday, November 9, 2011

मी एक स्वतंत्र वर्तुळ

ऊल्हास भिडे यांच्या "π (२२/७)"" :http://www.maayboli.com/node/22901
या कवितेकडून प्रेरित होऊनमाझ्या भावनांचे
अर्थ उलगडत, संदर्भ देत
भावभावनांच्या गुंत्यात
राहिले मी गुंतत
मी आखलेल्या पण
तू दुर्लक्षिलेल्या
व्यापलेल्या परिघाच्या
वर्तुळाच्या केंद्री....
मी .....
……………………
हळूहळू हळूहळू
माझा परिघ
आकसत गेला
मग एक नवेच
फक्त माझे असे
स्वतःचे व्यक्तित्व असलेले
"माझे" वर्तुळ
सापडले मला
तू मात्र पूर्वीच्यात
पारंपारिकतेत मश्गुल
माझ्या वर्तुळाच्याही परीघा बाहेर
माझ्यापासून कितीतरी दूर.....

Monday, October 24, 2011

आयुष्य

काल होता, सूर्य उद्याचा, कवेत माझ्या
झाकळून आले, आजचे नभ, अंगणात माझ्या

नवजात होत्या कल्पना, नवथर होत्या अल्पना
संसार गाडा ओढताना, फव-त ठरल्या वल्गना

कालच्या ताज्या दुधाची, झाली उद्याला कढी
गालबोट एक दह्याचे, आयुष्य सारे विरजले.

Sunday, September 4, 2011

इंद्रधनुष्य
"बघ,
पुन्हा उशीरा आलास तू...
केलीस ना पुन्हा
माझी घालमेल ?"
काळेभोर मेघ डबडबले...


अन तेव्हढ्यात
हसलास तू...
ओंजळ पुढे केलीस
सोनटक्क्याची
सोनेरी, नाजूक,
लखलखीत उन्हाची
अय्या कित्ती छान !
अन हो रे,
अशाच वेळेस
पडतं ना रे
इंद्रधनुष्य ?
ए बघ ना रे,"अगं मी बघतोच आहे ते..."
अन बघितलं तर
पडलच होतं प्रतिबिंब
त्याच्या डोळ्यात...
एका हसर्‍या इंद्रधनुष्याचं .... !

Saturday, August 27, 2011

अद्वैत ( संस्कारित)

माझ्या हाकेला ओ देऊन उल्हास भिडे यांनी माझ्या या 'लेकी'ला संस्कारित केले ते असे :

यमुनेच्या तीरी राधा, वाट पाही श्रीरंगाची
मिटलेल्या लोचनांत, मूर्ति चित्तचोरट्याची

रूप हरीचे साजिरे, तिच्या मुखी रेखीयले
नाग लाघवी वेणूचे, वेणीवर उतरले

गिरीधारीचे चैतन्य, धडधडे तिच्या ऊरी
घनश्यामाची निळाई, उतरली देहावरी

तनी मनी मोहरली, राधा राधा ना राहिली
तन श्याम मन श्याम, राधा कृष्णरूप झाली

आला कान्हा अवचित, आणि जाहला स्तंभित
बिंब स्वत:चेच की हे, द्वैतामधले अद्वैत

अन शिवाय तिला "अरे संसार संसार" किंवा ’वादळवाट’ सिरियलच्या
शीर्षकगीताच्या चाली फिट्ट बसतात हेही सांगितले.

Thursday, August 25, 2011

रुका हुवासा है, आज जमाना एक

मागे एकदा मी "कृष्णा..." ही कविता टाकली होती, तीच आज हिंदीतून अशी आली...
(राधा-कृष्णा बद्दल कित्ती तरी लिहिलं गेलं. पण राधेने कृष्णाचा शेवट कसा पेलला असेल याचा विचार करताना हे सुचले.)


रुका हुवासा है, आज जमाना एक
ठंड के छोटे छोटे दिन, धुंद में लिपटी शाम
चुपचाप खडे पेड, धुंदलीसी राह
यमुनाका नीरव किनारा, ठहराया शामल जल
गहरी परछाईयाँ, हिलाते हुए पेड
हलकेसे डुबकी लगाती नीली मछली एक
और पावोंमे चुभती हुई सफेत रेत
रुका हुवासा है, आज जमाना एक

तुम्हारा लाडला कदंब, आज झुका हुवा क्यू है
यमुना की लहरे, आज रुकी रुकी क्यू है
अष्टमी की चाँदनी, आज उदास सी क्यू है
पवन की बांसुरी, आज ऐसी अबोल क्यू है
आसमंत मे आज, सन्नाटे की आहट क्यू है
और इस सन्नाटे के बोल, आज आर्त क्यू है
रुका हुवा सा जमाना, आज क्यू है

खाली है यमुनाकी रेत
खाली है कदंब की छाया
खाली है वृंदाबन का खेल
खाली है मथुरा का कुंभ
खाली है बांसुरीका सूर
खाली है आत्मा की उमंग
है कदंबके पैरोंतले सिर्फ तीर एक
रुका हुवासा है, आज जमाना एक

"हाय ssss....
बस, बस, अब बस भी करो...
नहीं, नहीं, न जाओ...
ठहरो, मुझे भी ले चलो..."
और फिर एक सन्नाटा...
रुका हुवासा है, आज एक जमाना

कल की सुबह हुई, लेके साथ में
सूरज की बुझी बुझी आखें
आसमंत की नीरविकार आखें
कदंब की नीरस हुई आखें
आकाशकी झुकी झुकी आखें
धरती की सुखी सुखी आखें
पवन की गिरी हुई आखें
और यमुना की भरी हुई आखें
पार्थीव राधाका, लिये साथ में
और कहीं दूर, दूर वहाँ जंगलों में
................ श्याम का
रुका हुवासा है, आज एक जमाना

Monday, August 8, 2011

पृथ्वीचे पाणिग्रहण !
जेष्ठातली उतरती सांज
उडू लागली धूळ त्यात
पसरली जणू आसमंतात
तव लग्नाची खबर-बातमग केली गर्दी मेघांनी
गेले सारे आभाळ भरुनी
आच्छादन पडे, होई सावली
छे, हा तर मंडप दारी

वारा सुटला, सुटली पाने
पखरण पिवळ्या पानांची
धरती झाली पिवळी पिवळी
हळद लागली नवरीचीघुमु लागली वार्‍याची सनई
तडतड ताशा वीज वाजवी
गडगडाट घुमला नभांगणी
छे, ही तर लग्नाची वाजंत्री
थेंब टपोरे पडू लागले
मोत्यांच्या लडीवर लडी
पोचू लागल्या गावोगावी
तव लग्नाच्या अक्षत-राशी

मातीच्या ढेपेतूनी वर
येऊ पाहे हिरवे रोप
दोन्ही पाने देती आशिष
पुजते गौरीहर तु त्यास


उमलूनी येई, ही पहाट
साकळलेले धुके दाट
विप्र उभे धरूनी ताठ
दोघांमधला अंतरपाट
पूर्व दिशेला नभी अवतरे
सप्तरंगी इंद्रधनु ते
जणू सुगंधी सुमनांची
शोभे मुंडावळी कपाळी

हिरवी हिरवी हिरवळ त्यावर
रंगबिरंगी सुमने नाजूक
धरती ल्याली नवे रूप
छे, हा तर शालू हिरवा तव


गाऊ लागले मधूर स्वरात
सारे खग-गण एक सूरात
एका मागूनी एक गाई
मंगलाष्टके सुरू झाली


झर्-झर झर्-झर झरू लागले
डोंगरातुनी खळ्ळाळ झरे
निशीगंधाच्या शुभ्र तुर्‍यांचे
शोभती हार वधू-वरांचे
उभे मध्ये मेघांचे तोरण
हळूच बघे वर रवी एक क्षण
झाले सारे केशरी भू-वन
संपन्न होई पाणिग्रहण !( हीच कविता अ‍ॅनिमेट केल्यावर अशी दिसली. ही कविता ’दिपज्योती दिवाळी अंक २०११, मध्ये प्रकाशित झाली )
 

Friday, July 8, 2011

करमाळ कळी

मायबोलीवरचा जिप्सीने अन शांकलीने निसर्गातले जे सौंदर्य दाखवलं ( http://www.maayboli.com/node/27177) त्याला हा माझा सलाम

अगदी थक्कच झाले मी
आज पाहिली निसर्गाची करणी
आखीव रेखीव पानांतुनी
डोकावे गोल फळ त्यातुनी
हिरव्या कच्च त्या फळातूनी
उमलू पाहे एक कळी

पाकळ्या अलगद फाकूनी
थेंबांना हळूच चुकवुनी
एक एक शुभ्र पाती
हलके हलके उमलती
उमलू पाहे एक कळी
हिरव्या कच्च फळातूनी

दिसले अंतरंग मनस्वी
पिवळ्या सोन्याच्या राशी
शुभ्र रेखीव फूल त्यावर खोची
जणू हिर्‍याचे पैलू पसरी
उमलू पाहे एक कळी
हिरव्या कच्च फळातूनी

मग हळूच सोडी
शुभ्र पाती खाली
पाचू आत सोनेरी
शुभ्र हिरा राही
उमलू पाहे एक कळी
हिरव्या कच्च फळातूनी

फळ जन्मी फुलातुनी
निसर्गाची किमया ही
नेहमी नेहमी पाहिली
आज पाहिली देवाची करणी
फुल फुले फळातुनी
उमलू पाहे एक कळी
हिरव्या कच्च फळातूनी

Monday, June 27, 2011

" रिता "

माझी "रिती" ही कविता आठवत असेलच. त्याला हा वेगळा झब्बू स्मित
"त्याच्या" सगळ्या प्रेयसींना एकत्रितपणे त्याची प्रेरणा कल्पून ही सुचली.........


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
भेटलीस तू मला
पण नाहीच देऊ शकलो,
साथ मी तुला

बालपणीच्या निरागस प्रवासात,
भेटलीस होऊन राधा
सोडून जाताना घेतला नाही,
निरोप सुद्धा साधा

करून सारे समर्पण,
बनलीस माझी रुक्मिणी
सुख्-दु:खांच्या तराजूत,
झालो फक्त तुळशी

तारुण्याच्या मखमलीत,
भेटलीस होऊन सत्यभामा
सोडताना फक्त लावून गेलो,
प्राजक्ताच्या झाडा

आयुष्याच्या उतरणीवर,
भेटलीस होऊन मीरा
दिला तुला प्यायला,
विषाचा एक प्याला

आयुष्याची इतकी वळणे,
चाललो अनेक वाटा
भोगले सारे सारे,
शेवटी पण मी एकटा

देणे सार्‍या आयुष्याचे,
पुरे फेडू जाता
तृप्त तुम्ही सार्‍या,
मी मात्र रिता !

Tuesday, May 17, 2011

घिर घिर आयी काली बदरियाँ

आज पावसाळी हवा भरून आली अन ही सुचली

घिर घिर आयी काली बदरियाँ
कहत संदेसवा, आयेंगे सावरियाँ |

उमड घुमड कर छायी है घटायें
दिल की धडकने लगी है सताने
कहत संदेसवा, आयेंगे सावरियाँ |

पवन दिवानी उडाये चुनरिया
घुंघट उठाये जैसे सावरियाँ
कहत संदेसवा, आयेंगे सावरियाँ |

झिम झिम बरसे बूंदे सावन की
जैसे बरसती है यादें सजन की
कहत संदेसवा, आयेंगे सावरियाँ |


अन ही मराठीतली

गच्च भरून आले जलद
ऐकू येतेय सजणाची साद |

नभ आले गडगडत
झाली कालवाकालव हृदयात
ऐकू येतेय सजणाची साद |

पदर उडवतोय वेडा वारा
जसा साजण पाही मुखचंद्रमा
ऐकू येतेय सजणाची साद |

बरसू लागले थेंब टपोरे
जणू आठवणींचे झेले
ऐकू येतेय सजणाची साद |

Friday, April 22, 2011

सृजनाचा सोहळा

आधी एक धून मनात हुरहुरत होती, मग त्यातून हिंदी शब्दच फुटले....


"बहारों ने इतना रुलाया है मुझ को
कई बरसातें बरस गई , यारों....

गुल खिले है इतने रंगीत सारे
के रंग जिंदगीका उजडा हुआ है

लदी हुई है टहनी, फलोंसे
पर नीरस हुई है जवान सॉसें

पेडों पर निकले है पत्ते बहार के
बस उजड गया है आशियाना यारों "

पण मग ती मराठीतही लिहिली...

वसंताने इतके रडविले, मला की
बरसूनी गेले, पावसाळे किती ....

फुलली फुले, इतुकी रंगीत सारी
की रंग माझ्यातले सारे, गेले विरुनी ....

फळांनी किती लवली फांदी, फांदी
की रसाळता सारी, आटुनी गेली ....

पालवी फुटे उतुकी , कोवळी कोवळी
की सृजनता सारी, शोषुनी गेली ....

Friday, February 18, 2011

चैतन्य !

चैतन्य माझा पहिला भाचा ! पुढच्या महिन्यात त्याचे लग्न... त्याच्या बालपणीच्या या काही गोड आठवणी...अजूनही मला लख्ख आहे आठवण
तो दिवस... आणि तो क्षण...

सुरू झाली होती ऑक्टोबर हिट
अन दुपारच्या भर उन्हात, गरम होती गाडीची सीट
धावतच चढले जिना तो उभट,
नर्सने दाखवले एका दिशेला बोट
खोलीत मी त्या घुसले थेट,
आत होता अंधार दाट

अन क्षणात दिसलास मला तू .....
पडद्याच्या झिरपणार्‍या मंद प्रकाशात, जाळी आड झोपलेला तू
गुलाबी कापसाची नुकतीच उमलेली कळी जणू तू
सुदृढ,सतेज,सुकुमार,गुलाबी गोरा,गब्दुल, गोंडुस तू
आमच्या घरातले पहिले बाळ तू
आमच्या घरी आलेला चैतन्य तू.......

अन मग घरी तू आलास.
आतापर्यंत न आवडणारा, धूपाचा वास
तुझ्या सान्निध्यात,मात्र झाला सुवास

आठवतात तुझे चमकणारे डोळे
तळपाय तुझे गुलाबी,गोबरे ;
सतत चुळबुळणारे हातपाय तुझे
अन हो, अगदी तुझे ओकरे बाळसे....

कधी आईचे केस हातात धरून झोपणारा तू
कधी बाबांच्या स्कूटरवर पुढे उभा राहणारा तू
कधी 'आबा काय करता' म्हणत त्यांच्यामागे फिरणारा तू
कधी आजीची लांब वेणी धरून तिच्या मागे लुटुलुटु फिरणारा तू
कधी मावशीबरोबर ऑफिसला जाण्याची स्टाईल मारणारा तू
कधी माझ्या केसांना गालावर घासण्यासाठी पाठीमागून गळ्यात पडणारा तू

तुझ्यासाठी तयार झालेली माझी, पिटीक पिटीक माकडाची गोष्ट
अन तुझ्या सोबतीने म्हटलेली कित्ती कित्ती बडबडगीतं
खेळलेले खेळ अन केलेली बाष्कळ बडबड
अन आठवतं
हे सगळे करताना पुरेपुर उसळणारे तुझं
चैतन्य........

मग आठवतोस तू ,
मी पहिली शिवलेली वीतभर उंचीची फुलपँट;
अन तळहाताएवढा फुलशर्ट घालून टकामका पाहणारा तू
मग छोट्या अमेय बाळा कडे कुतुहलाने बघणारा तू
नंतर राहूल बाळाला मांडीत घट्ट पकडून बसलेला तू
मधुराचा झालेला जबाबदार दादा तू
अन चुळबुळ्या, चिडक्या , रागीट निखिलला कडेवर घेणारा तू......

कधी आठवतोस राहूल बरोबर, चिक्कू-आंब्याच्या झाडांवरून उड्या मारणारा तू.
तर कधी आठवतोस, लांबलचक फुलांची माळ घेऊन हॉलभर लुटुलुटू पळणारा तू.
कधी आठवतोस काळ्या सिल्कच्या मधला, तर कधी लालभडक गंजीतला तू.
कधी आठवतोस हिरव्या झब्ब्यातला, "शिष्ठ" पणा दाखवणारा भलताच गोंडूस तू.
तर कधी पायर्‍यांवर, थंडीतल्या उन्हात, आमच्याबरोबर शेकत बसलेला तू.

कधी आठवतोस तू, झालेला बनी रॅबिट
खरा रॅबिटही कधी दिसला नाही; तुझ्याइतका क्यूट.
कधी आठवतोस शाळेतल्या ड्रेसमधला तू,
तर कधी गॅदरिंगमधल्या नाचातला तू.
कधी आठवतोस कापलेल्या केसांची वेणी रागावून फेकून देणारा तू
अन कधी चिकनची तंगडी मन लावून खाणारा तू.

अन मग गेलास वर्षभर त्या लांब लांब देशात तू.
फोनवरून 'हॅलो माई' म्हणणारा तू
अन तीन मिनीटात फोनमधून भेटायचा प्रयत्न करणारे आम्ही.
आईच्या खुप मोठ्या पत्रांतून अन त्यातून येणार्‍या फोटोंतून
पाहिले आम्ही वाढताना तू

अन मग तू आलास; दिसलास एअरपोर्टवरती
धावत येऊन, उडी मारून; घट्ट मारलीस मिठी
आजही आठवते, डोळ्यात आणते पाणी
पाच मिनिटं ती तुझी , माझ्या जन्माची सोबती