Saturday, November 13, 2010

खरेतर जगणे हाच, आनंद असतो

फक्त एका क्षणाचा, हिशोब चुकतो
आयुष्याचा सारा, आलेखच बदलून जातो

गाडीतून जाताना, फलाट लांब रहातो
फडकता रुमाल, फक्त हातात रहातो

आधाराचा हात, हातात असतो - नसतो
सोबतीचा आभास, फक्त मनासाठी असतो

प्रत्येक क्षण काही, आपला नसतो
आपला क्षण, आपणच शोधायचा असतो

फक्त एकच निमिष, आपला असतो
त्यातच सारा अर्थ, मानायचा असतो

जन्मभर आनंदाचा, शोध घेत असतो
खरेतर जगणे हाच, आनंद असतो.