Thursday, November 26, 1987

प्रिय सूर्यफुला


तुझाच मला आधार होत.
तुझ्या सावल्या टाळत
अंधार मी खोदत होतो.

एकदा विचार आला,
चढून पहावा सूर्य एकदा !
पण तेव्हढ्यात थबकलो,
विचार केला....
त्यासाठी तुझ्या सावलीतून,
तुझ्या देठावरून जाताना,
एखाद वेळेस
तुझ्या पाकळीलाच
सूर्य समजून थांबलो तर ?

आणि म्हणून
तुझ्या सावलीशी
थबकलो, मागे सरलो
आणि
तेव्हाच मला उमगले,
उमलले,
मीच एक सूर्यफूल
मीच एक सूर्यफूल

Saturday, July 11, 1987

असते ती फक्त ...........

सुख असतं; पण ते फुलण्याइतपतच
कृतार्थता, महत्वाकांक्षा, अधिकार ;
तेही असेच गोंजारणारे !

दु:खही तसं अहंकाराशी जोडलेलं
पराभव, अपमान, विश्वासघात
तसे सगळेच त्या अहंकाराचे !

इतरही तळ्या-मळ्यातले...
एखादी पुसट सीमा घेउन
एकमेकांना ढुशा देणारे !

तसं पाहिलं तर
आपलं असं काहीच नसतं;
असते ती फक्त
एक अलिप्त उदासिनता........... !

Thursday, January 22, 1987

नकार

माझ्याच मैफिलीला मी जागलेच नाही
माझ्यातल्या मलाही आपले न मानले मी

माझ्याच भावनांना सूरशब्द ना दिले मी
होकारास तुझ्याही हुंकार ना दिला मी

कालच्या सर्व चुका माझ्याच मानल्या मी
अन नव्या जाणिवा या नाकारल्या आज मी ही