Wednesday, November 26, 1986

बंध

तुझा माझा एक बंध
पण ना
खिळवून टाकणारा गंध

गर्भात असतानाही
तुझा ताल वेगळा
ताराही वेगळ्या झाल्या
जन्म देताना

आता फक्त
सारखे सूर छेडण्याचा
हा आमरण प्रयत्न ...

Monday, November 24, 1986

कॅटॅलिस्ट

माझा मलाच होकार देताना
परंपरेचे, संस्काराचे, सल्ल्यांचे
सारे सारे धागे ;
उरापोटी आवरावे लागले.

तेव्हा धाऊन आली
तुझी आस्था, आपुलकी
आणि
शब्दांहूनही खुप काही....!

श्रद्धेचे बंध तोडताना
व्यवहाराचा काठ सोडताना,
आधार होता तो फव-
तुझ्या विश्वासाच्या पंखांचा.

माझे पंख फडकताच
तू मात्र
हळूच दूर झालास,
कॅटॅलिस्ट सारखा.... !