Wednesday, November 26, 1986

बंध

तुझा माझा एक बंध
पण ना
खिळवून टाकणारा गंध

गर्भात असतानाही
तुझा ताल वेगळा
ताराही वेगळ्या झाल्या
जन्म देताना

आता फक्त
सारखे सूर छेडण्याचा
हा आमरण प्रयत्न ...

Monday, November 24, 1986

कॅटॅलिस्ट

माझा मलाच होकार देताना
परंपरेचे, संस्काराचे, सल्ल्यांचे
सारे सारे धागे ;
उरापोटी आवरावे लागले.

तेव्हा धाऊन आली
तुझी आस्था, आपुलकी
आणि
शब्दांहूनही खुप काही....!

श्रद्धेचे बंध तोडताना
व्यवहाराचा काठ सोडताना,
आधार होता तो फव-
तुझ्या विश्वासाच्या पंखांचा.

माझे पंख फडकताच
तू मात्र
हळूच दूर झालास,
कॅटॅलिस्ट सारखा.... !

Friday, October 31, 1986

द्वैत

माणसांच्या पुरातून
उसळणारे,
हे आयुष्य !
प्रत्येक उसळीसरशी
आणखीन फेसाळणारे,
शुभ्र पांढरे....!
आणि तरीही
दुभंगत जाणारे....,
वार्‍यातून - लाटांतून
भरकटणारे...!
तरीही
डोलकाठीच्या स्वामित्वाची इच्छा
आकांताने उराशी लावून...,
नाही;
अनंताशी नाते सांगताना
वेगळेपण मी जपणार आहे !

Friday, October 17, 1986

आस

समोरून येणारी अनेक श्वापदे,
रोखलेली शिंगे..., आवासलेले जबडे...!
पाय रोवून, मनावर ताबा ठेवून...
आणि तरीही आतल्या आत
बंदिस्त होत..
सामोरी जाते आहे,
ताठ उभी राहून !
अनेक भावना, आकांक्षा...
हातावर पापणीचा केस ठेवून-
तो उडण्याची वाट पहात,
ही मालिका संपेपर्यंत
पाहते आहे, भरभरून
कोसळणार्या अंधाराकडे !
.............................
...............................
............................... !
संकटापासून पळून जाण्याची
माझीच एक भयंकर आस !

Thursday, October 16, 1986

मुखत्यार

तू विचारले नाहीस ,
मी ही ते गृहित मानले.
तेच आज मात्र नवीन भासवून
तू, तिसर्याकरवी मान हलवलीस....

तिची डावी-इजवी सारं काही सांगून गेली....
तुझी तडजोड, तुझा भित्रेपणा...
की साधा सरळ व्यवहार ?

पण विसरलास ?
या व्यवहारात डोळ्यांची भाषा
तूच सुरू केली होतीस, कधीकाळी...

त्याबद्दलही तक्रार नाही,
तुझा तू मुखत्यार आहेस !
पण माझ्या वेलीला
खतपाणी घालून,
फांद्या छाटण्यात,
तू काय मिळवलस ?
तिची मूळं तर
तशीच राहिलीत ना ?

दु: इतकच,
ती रुजवण्यास, वाढवण्यास, जपण्यास
माझी मीच मुखत्यार राहिले....!

Friday, October 3, 1986

मादाम तुसाँ


प्रत्येकाच्या मनात
एक एक मादाम तुसाँ .
फरक इतकाच
ती बनवतेय बोन्साय !

स्वतःच्याच अपेक्षांनी
प्रत्येकाला वेगळे रंग.
"माझ्या मनातल्या ;
तुझ्या बोन्सायसारखा
नाही तू रंगलास..."
ही चूक तुझी -
-माझी नाही....
प्रत्येकाची हीच खात्री !

"तुझे बोन्सायच ;
तुझ्यापेक्षा
मला, माझे वाटतात..."
माझे माझ्यावरच
अगाढ प्रेम !

३.१०.१९८६

Tuesday, June 24, 1986

सूरावट

रोजचा तो पावसाळा
रोजची तीच ती उन्हे
पण कसे कोण जाणे
आजचे हे किरण नवे.

कोंब हा नेहमीचचा अन
पानगळही ही नेहमीचची
पण कशी कोण जाणे
ही नव्हाळी मात्र नवी.

ओळखीचा तोच तू अन
मी ही तीच ती जुनी
पण कशी कोण जाणे
आज ही जाणीव नवी.

रोजचे ते शब्द हेच अन
तीच ती गाणी जुनी
पण कशी कोण जाणे
ही सूरावट वेगळी

Thursday, May 1, 1986

प्रिय सर

[ सरांनी नेहमीच आमच्या शंका अतिशय मायेने सोडवल्या अन त्यामुळे आम्ही सर्वच जण जरा सोकावलोच होतो, त्यांच्याकडे शंका घेऊन जायला :) ]

अशीच एकदा बसले होते
वादळ घेऊन विचारांचे
एक झुळूक हळूच आली
हलकेच लाटांना थोपटून गेली.

वळून पाहिले , ती एक म्हातारी
सावरीच्या कापसाची...
तेव्हापासून चटक लागली
विचारांचे वादळ घेऊन
तिचा माग रोज घेते
तिच्याच झाडाला डोकं टेकून
वादळ हलकेच शांत करून
तिच्या गावी निघून जाते
माझ्या गावचीच
नसल्यासारखी .....

आजही मी शोधते आहे
त्याच त्या म्हातारीला
वादळातून
वाट काढत.......... !

Wednesday, April 16, 1986

जाण

ती एक नवीवच जाण
नवीनच पहचान
पण पुरते ओळखण्याआधीच
फव- ओझरती चुंबून ,
लहरत पुढे गेली....
हो, अगदी, अगदी तशीच...
सायलीच्या हळूवार गंधासारखी....