Monday, October 15, 1979

समांतर रेषा

एखाद्यावरून जीव ओवाळून टाकायलाही धैर्य लागतं.
तुझ्या-माझ्याजवळ ते नसेलच असं मी म्हणत नाही;
पण मी तुझ्यासाठी, तू माझ्यासाठी; आता ते करणार नाही.
दोघांच्या वाटा आता भिन्न आहेत....
पण कधीकाळी तरी त्या मिळाल्या होत्या का ?
सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण समांतरच होतो,
कधीकाळी छेदण्याचा विचारही केला नव्हता...
मग ही लागलेली हूरहूर कोणासाठी? कशासाठी ?
आपल्या दोघांमध्ये भरून राहिलेल्या पोकळीसाठी ?
की या कळलेल्या समांतर रेषांसाठीच ?

Friday, May 18, 1979

आधुनिक फ्लॅटच्या जमिनी

चौकोनावर चौकोन, अगणित चौकोन
एकात एक मिसळलेल्या भावनांची भेसळ.
कमी झाले म्हणून की काय
एक गुंतवळ तिथेच पडलीय
बंडाळ्या रोखून धरण्यासाठी
प्रत्येक केस आसुसला आहे.
एक चौकोन सुटका करू पाहतो;
जवळचाच केस दक्षतेने पाय घालतो !

(चौकोन म्हणजे व्यव-तीच्या भावभावना. अन मानवी समाजाचे प्रतिनिधित्व करतेय एक गुंतवळ .)